जळगाव ते पुणे एसटीची स्लीपर कोच सेवा उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:37 PM2018-05-16T13:37:34+5:302018-05-16T13:37:34+5:30
दोन बसेस् दाखल
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १६ - जळगाव ते पुणे दरम्यान परिवहन महामंडळाची स्लीपर कोच सेवा गुरुवार, १७ मे पासून सुरू होणार असून त्यासाठी जळगाव आगारात दोन स्लीपर कोच बसेस् मंगळवारी दाखल झाल्या. जळगाव येथून पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने खाजगी आराम बसेस्ला गर्दी असते. त्या स्पर्धेत टिकण्यासाठी परिवहन महामंडळानेही ही सेवा सुरु करीत आहे.
दररोज रात्री १० वाजता सुटणार बस
जळगाव येथून पुणे येथे जाण्यासाठी दररोज रात्री १० वाजता बस रवाना होईल. परतीच्या प्रवासातही पुणे येथून रात्री १० वाजताच ही बस सुटेल. एका बाजूने प्रति प्रवासी ९१५ रुपये भाडे राहणार आहे.
नेरी नाक्यावरील थांब्यापासून बस रवाना होणार
सध्या पुणे येथे जाणाºया खाजगी आराम बसेस्च्या नेरी नाक्यानजीक असलेल्या थांब्याजवळच ही बस थांबणार असून तेथून प्रवासी भरून ही बस निघेल व मुख्य बसस्थानकावर येऊन पुण्याकडे रवाना होणार आहे.
उशिरा निघून लवकर पोहचविणार
प्रवाशांच्या सोयीसाठी रात्री उशिरा निघून सकाळी लवकर ही बस पोहचण्यावर भर राहणार असून त्यासाठी थांबेदेखील कमी करण्यात येणार आहे व तसे नियोजन केले जात असल्याचे देवरे यांनी सांगितले.
भुसावळसह इतर स्थानकातूनही लवकरच स्लीपर कोच
जळगाव आगारासह लवकरच भुसावळ, अमळनेर व जिल्ह्यातील इतर आगारांमध्येही स्लीपर कोच बस दाखल होणार असून तेथूनही पुण्यासाठी ही सेवा लवकरच सुरू होईल, अशी माहिती देवरे यांनी दिली.
स्लीपर कोच बसच्या स्वागत प्रसंगी एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष आर. के. पाटील, सेना अॅक्शन टीम प्रमुख गोपाळ पाटील, दिलीप सूर्यवंशी, विठ्ठल धोबी, बंडू उपाध्ये, प्रकाश सोनवणे, उर्मिला सूर्यवंशी, राजू चौधरी, अशोक चौधरी व एसटी कर्मचारी उपस्थित होते. या बसमध्ये प्रथमश्रेणीची वातानुकूलित व्यवस्थेसह संगीत व्यवस्था आहे.
जळगाव आगारासाठी १५ मे रोजी दोन स्लीपर बसेस् दाखल झाल्या आहेत. त्यांची तपासणी करणे, एसी व्यवस्था व इतर आवश्यक पूर्तता करण्यात येऊन या बसेस् १७ मे पासून पुणे मार्गावर धावतील
राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक.