विशेष उत्सव गाड्यांमुळे जळगाव रेल्वे स्टेशनला सव्वा कोटींची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:11+5:302020-12-24T04:16:11+5:30
कोरोनामुळे गेले काही महिने बंद असलेली रेल्वेसेवा, अनलाॅकच्या पाचव्या टप्प्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष प्रवासी ...
कोरोनामुळे गेले काही महिने बंद असलेली रेल्वेसेवा, अनलाॅकच्या पाचव्या टप्प्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष प्रवासी गाड्यांसह विशेष उत्सव गाड्यादेखील रेल्वेतर्फे सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाड्यांना जनरल तिकिटे देण्याची सुविधा न ठेवता, फक्त तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे गाडीत प्रवेश देण्यात येत आहे. दसरा, दिवाळीपासून सुरू केलेल्या या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, सध्या नाताळ सणानिमित्तही या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जळगाव स्टेशनवरून या विशेष उत्सव गाड्यांना भरघोस उत्पन्न मिळाले असून, गेल्या महिन्यात ३२ हजार ३७५ प्रवाशांनी तिकीट खिडकीवर तिकीट काढले होते. यातून रेल्वेला एक कोटी ३२ लाख ६१ हजार ८८५ इतकी कमाई झाली आहे.
इन्फो :
कमी गाड्यांमुळे तिकीट आरक्षित होईना :
सध्या रेल्वेतर्फे विशेष गाड्या आणि विशेष उत्सव प्रवासी गाड्या सुरू असल्या तरी, या गाड्यांची संख्या अपूर्ण असल्यामुळे, तिकीट आरक्षित होत नसल्याच्या प्रवाशांतर्फे तक्रारी करण्यात येत आहेत. चार ते आठ दिवस आधी तिकीट बुकिंग करूनही, आरक्षित होत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच रेल्वेत तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश मिळत असल्यामुळे, प्रवाशांना नाइलाजस्त तिकीट रद्द करावे लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत जळगाव स्टेशनवरून चार हजार २६८ प्रवाशांनी तिकीट रद्द केले असून, यातून १८ लाख ३८ हजार ६९८ रुपयांचा परतावा प्रवाशांना देण्यात आला आहे.
इन्फो :
जनरल तिकीट मात्र बंदच :
सध्या सुरू असलेल्या गाड्यांमध्ये तिकीट खिडकीवरून तात्काळ जनरल तिकीट काढून, प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचोरा, चाळीसगाव, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची व चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट सुरू करण्याची मागणी विविध प्रवासी संघटनांतर्फे करण्यात येत आहे.
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्या व उत्सव गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांचे तिकीट लवकर आरक्षित होत नाही. मात्र, टप्प्याटप्प्याने जसजशी गाड्यांची संख्या वाढेल, त्यावेळी प्रवाशांची गैरसोय दूर होईल.
युवराज पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ रेल्वे विभाग