जळगावला मिळाले कोव्हॅक्सिनचे २२० डोस कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:43+5:302021-07-09T04:12:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या तीन दिवसांपूर्वी कोव्हॅक्सिनचे २२० डोस कमी मिळाल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागाने नाशिक आरोग्य विभागाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या तीन दिवसांपूर्वी कोव्हॅक्सिनचे २२० डोस कमी मिळाल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागाने नाशिक आरोग्य विभागाला कळविले असून आता नाशिक जिल्ह्यात कळवण-नांदुरी रस्त्यावर बेवारस स्थितीत पडून असलेल्या लसी या जळगावच्याच होत्या, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. दरम्यान,या प्रकरणात नाशिक आरोग्य विभागाच्या वाहन चालकाची चौकशी झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
जिल्ह्याने लसींची मागणी नोंदविल्यानंतर पुणे येथून लसींचा पुरवठा हा नाशिकला केला जातो, या ठिकाणाहून नाशिक आरोग्य विभागाचे वाहन या लसींचा साठा हा धुळे आणि जळगावला पाठवित असते, यात कधी जळगावचे वाहन तर कधी नाशिकचे वाहन हा साठा पोहचवत असते, गेल्या आठवड्यात नाशिक आरोग्य विभागाच्या वाहनातून आलेल्या लसींमध्ये जळगावला २२० डोसचा कमी पुरवठा झाल्याचे लक्षात आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात बेवारस आढळून आलेल्या या लसी जळगावच्याच असल्याचे चौकशीत समोर आल्याचे सूत्रांकडून समजते. चालकाने शॉर्टकट वापरल्याने रस्ता खराब असल्याने कदाचित हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत असून चालकाला समज देण्यात आल्याचे समजते. नाशिक जिल्ह्यात गोबापूरकडून नांदुरीकडे जात असताना कल्पेश जेठार यांना गोबापूर शिवारात या लसी आढळून आल्या होत्या. त्यांनी त्या नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा केल्या होत्या. ३ जुलै रोजी हा प्रकार घडला होता.
लसी केल्या नष्ट
कोल्ड चेन अर्थात योग्य तापमानात न राहिल्याने या लसी नष्ट करण्यात आल्या असल्याची माहिती आहे. दरम्यान, एकूण लसींमध्ये २२० लसी वगळूनच एकत्रित डोसचा आकडा कळविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
आज सर्व केंद्र बंद
शहरात कुठल्याच लसीचा साठा शिल्लक नसल्याने महापालिकेच्या सर्व केंद्रांसह रोटरी भवन व रेडक्रॉस ही केंद्रही बंद राहाणार आहेत. गुरुवारी कोविशिल्ड लस नसल्यानेही महापालिकेची ७ केंद्र बंद होती. केवळ चेतनदास मेहता केंद्रावर कोव्हॅक्सिन सुरू होते. दरम्यान, शनिवारी लस येणार असल्याने रविवारी ती केंद्रांवर उपलब्ध होणार आहे.