जळगाव ‘रेडक्रॉस रक्तपेढी’ राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:33 PM2019-08-22T12:33:10+5:302019-08-22T12:33:35+5:30

सर्वाधिक रक्तसंकलनासह सर्वात जास्त थॅलेसेमिया रुग्णांना दिला लाभ

Jalgaon 'Red Cross Blood Bank' tops the state | जळगाव ‘रेडक्रॉस रक्तपेढी’ राज्यात अव्वल

जळगाव ‘रेडक्रॉस रक्तपेढी’ राज्यात अव्वल

Next

जळगाव : भर उन्हाळ््याच्या चार महिन्यांच्या काळाचा समावेश असलेल्या जानेवारी ते जून या सहा महिन्यात सर्वाधिक रक्तसंकलन करीत सर्वात जास्त थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देणाऱ्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीची जळगाव शाखा राज्यात अव्वल ठरली आहे. या शाखेने सहा महिन्यात तब्बल ५ हजार ९८४ बाटल्यांचे रक्तसंकलन करीत थॅलेसेमियाच्या ८७३ रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले. या पूर्वीही मानाचे दोन पुरस्कार मिळालेल्या जळगाव शाखेने पुन्हा राज्यात अपूर्व कामगिरी दाखवून दिली आहे.
जळगावात १९८०मध्ये सुरुवात झालेल्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जळगाव शाखेने दिवसेंदिवस नवीन व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करीत गावोगाव जाऊन रक्तसंकलनावर भर देत रुग्णांना संकटसमयी वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याची चोख कामगिरी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे दिवसेंदिवस आपले रक्तसंकलन वाढवित या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्याच्या टप्प्यात तब्बल पाच हजाराच्या पुढे बाटल्यांचे रक्तसंकलनावर झेप घेतली.
याचमुळे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या मुंबई येथील मुख्य शाखेने जाहीर केलेल्या क्रमवारीत जळगाव शाखा राज्यात अव्वल ठरली आहे.
प्रतिकुलतेवर मात करीत वाढविले रक्तसंकलन
या सहा महिन्यांचा काळ पाहिला तर यातील चार महिने तर उन्हाळ््याचे होते. एरव्ही दरवर्षी उन्हाळ््यामध्ये रक्तदान शिबिरांची संख्या कमी होण्यासह रक्तदातेही या काळात पुढे येत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत यंदा जळगाव शाखेच्यावतीने मे महिन्यामध्ये ‘रक्तपेढी आपल्या दारी’ हा उपक्रम राबवित गल्लोगल्ली जाऊन रक्तसंकलन केले. या सोबतच रोटरी वेस्टतर्फे फिरते रक्तदान शिबिर घेऊन औद्योगिक वसाहत, शहरातील विविध ठिकाणी रक्तसंकलन करण्यात आले.
या सर्वांचा परिणाम म्हणजे सहा महिन्यांच्या काळात रक्तपेढीने ५ हजार ९८४ बाटल्यांचे रक्तसंकलन केले. या सोबतच या सहा महिन्यात थॅलेसेमियाच्या ८७३ रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले.
राज्याच्या इतर ११ शाखांच्या तुलनेत ही आकडेवारी मोठ्या फरकाने जास्त असल्याने राज्याच्या मुख्य शाखेनेही या गौरवास्पद कामगिरीची दखल घेत इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या अहवालात याचा उल्लेख केला.
या पूर्वीही या रक्तपेढीला ‘महाराजा ट्रॉफी’सह दोन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
रक्तपेढीने न्यूक्लिक अ‍ॅसिड टेस्ट (नॅट) या जगातील सर्वात सुरक्षित रक्त यंत्रणेचा स्वीकार करीत रक्तांचे वेगवेगळे घटक उपलब्ध करून देत असल्याने रुग्णांना मिळण्याºया सुविधेची दखल घेतली जात आहे.
‘लोकमत’चे सहकार्य
भर उन्हाळ््यामध्ये रक्त संकलनाचे प्रमाण घटलेले असताना ‘लोकमत’ने २६ मे रोजी ‘वाढत्या उन्हामुळे रक्ताचा झराही आटला’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे लगेच रक्तदाते पुढे सरसावले होते. त्यामुळेही रक्तसंकलन वाढण्यात ‘लोकमत’चेही मोठे योगदान असल्याचे रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी आवर्जून सांगितले.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जळगाव शाखेने अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे तसेच सर्वच पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने राज्यात सर्वाधिक रक्तसंकलन करीत सर्वात जास्त थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देऊ शकलो व त्यामुळेच राज्यात आमची शाखा प्रथम ठरली. भर उन्हाळ््यात ‘लोकमत’ने केलेल्या सहकार्यामुळेही मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन होण्यास मदत झाली.
डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, चेअरमन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढी.

Web Title: Jalgaon 'Red Cross Blood Bank' tops the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव