जळगावकरांचा अपेक्षा भंग : विरोधी पक्षनेत्यांसह ६९ नगरसेवक ठरले ‘मौनीबाबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:48+5:302021-07-14T04:18:48+5:30

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा अधिनियम कलम ४४ नुसार मनपातील लोकनियुक्त ७५ व ५ स्विकृत अशा ...

Jalgaon residents' expectations dashed: 69 councilors including Opposition leaders become 'Maunibaba' | जळगावकरांचा अपेक्षा भंग : विरोधी पक्षनेत्यांसह ६९ नगरसेवक ठरले ‘मौनीबाबा’

जळगावकरांचा अपेक्षा भंग : विरोधी पक्षनेत्यांसह ६९ नगरसेवक ठरले ‘मौनीबाबा’

Next

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा अधिनियम कलम ४४ नुसार मनपातील लोकनियुक्त ७५ व ५ स्विकृत अशा ८० नगरसेवकांपैकी केवळ ११ नगरसेवकांनी २९ महिन्यांचा कार्यकाळात सभागृहात २३ प्रश्न उपस्थित केले आहेत. तर तब्बल ६९ नगरसेवक ‘मौनी बाबा’ ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या सध्यस्थितीत असलेल्या २७ पैकी केवळ अ‍ॅड.शुचिता हाडा व कैलास सोनवणे यांनी प्रश्न मांडले आहेत. तर शिवसेनेकडून नितीन लढ्ढा यांनी सर्वाधिक ७ प्रश्न महापालिकेच्या महासभेत मांडले आहेत.

मनपाची ऑगस्ट २०१८ मध्ये निवडणूक झाली आहे. या २९ महिन्यांच्या काळात एकूण १९ महासभा झाल्या आहेत. मात्र, त्यामध्ये केवळ ११ नगरसेवकांनी मनपा अधिनियम कलम ४४ नुसार सभागृहात प्रश्न मांडले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या नितीन लढ्ढा, नितीन बरडे, विष्णू भंगाळे व भाजपचे कैलास सोनवणे व ॲड.शुचिता हाडा या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. तर एमआयएमच्या एका नगरसेवकाने सभागृहात प्रश्न उपस्थित केला आहे.

विरोधी पक्षनेते ठरले मौनी बाबा

मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते असतानाही सभागृहात त्यांनी एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. त्यांच्याखेरीज भाजपचे गटनेते भगत बालाणी, सेनेचे गटनेते अनंत जोशी व एमआयएमचे गटनेते रियाज बागवान हे देखील महासभेत गप्पच राहिले आहे. आयत्यावेळच्या विषयातच सर्व गटनेत्यांचा आवाज निघाला आहे. तर विद्यमान उपमहापौर कुलभुषण पाटील, माजी उपमहापौर सुनील खडके, डॉ.अश्विन सोनवणे हे देखील गप्पच राहिले आहेत.

आयत्यावेळच्या विषयांवर भर

भाजपच्या अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी एलईडीबाबत लक्षवेधी मांडली होती. तर सफाईच्या ठेक्यावर देखील काही प्रश्न सभागृहात चांगल्या पध्दतीने उपस्थित केले. तर भाजपचे स्विकृत सदस्य कैलास सोनवणे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये भूसंपादनाच्या विषयावर लक्षवेधी मांडली. यासह स्वच्छतेचा मक्ता व एलईडीच्या मुद्यावर देखील लक्षवेधी मांडली. या व्यतिरीक्त मात्र काही आयत्यावेळच्या विषयावर भगत बालाणी, उज्वला बेंडाळे, विशाल त्रिपाठी, सदाशिव ढेकळे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर इतर २२ नगरसेवकांनी सभागृहात ‘मौन’ बाळगणेच पसंत केले आहे.

१. युवा नगरसेवकांचा आवाज ही निघेना

डॉ.चंद्रशेखर पाटील, जितेंद्र मराठे, धीरज सोनवणे, रेश्मा काळे, दीपमाला काळे, अमित काळे, गणेश सोनवणे, रियाज बागवान यांच्यासारखे युवा नगरसेवक सभागृहात आहेत. त्यामुळे या नगरसेवकांकडून अभ्यासपुर्ण मुद्दे सभागृहात मांडले जातील अशी अपेक्षा होती. मात्र, यापैकी एकाही नगरसेवकाने सभागृहात प्रश्न मांडलेले नाही. अभ्यासू समजले जाणारे विशाल त्रिपाठी हे देखील सभागृहात गप्पच आहेत.

२. महिलांचा आवाजही दबला

सभागृहात सर्वात जास्त महिला सदस्य आहेत. ॲड.शुचिता हाडा यांनीच एकमेव प्रश्न मांडला आहे. इतर महिला नगरसेवकांनी सभागृहात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे यांच्या सारख्या आक्रमक नगरसेविकांनीही प्रश्न उपस्थित केलेला नाही.

नितीन लढ्ढा, नितीन बरडे,ॲड.हाडांकडून परिपुर्ण मांडणी

शिवसेनेचे नितीन लढ्ढा व नितीन बरडे यांनीच वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून, प्रशासनाला व तत्कालीन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. लढ्ढा यांनी एलईडी, स्वच्छतेचा मक्ता व भूसंपादनाच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडली. तर हुडको कर्ज प्रश्न, अतिक्रमण, पाणी पुरवठा या मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर नितीन बरडे यांनी देखील पाणी पुरवठा व गळत्यांचा प्रश्न सभागृहात सातत्याने मांडले आहेत. शिवसेनेकडून कलम ४४ नुसार केवळ प्रशांत नाईक व विष्णू भंगाळे यांनी देखील प्रश्न मांडले.

जनतेचे प्रश्न सोडून श्रध्दांजली व अभिनंदनाचेच प्रस्ताव जास्त

जनतेच्या प्रश्नांवर केवळ चार नगरसेवकांनीच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर श्रध्दांजली व अभिनंदनाचे महासभेत तब्बल २०० हून अधिक प्रस्ताव नगरसेवकांकडून सादर केले आहेत. दरम्यान, सभागृहात सदस्यांची उपस्थिती सरासरी ८७ टक्के इतकी आहे.

-२९ महिन्यात झाल्या १९ महासभा

-३७२ ठराव मंजूर ; ३३ नामंजूर : ५ स्थगित

-आरोग्य, वॉटरग्रेस, एलईडी, भूसंपादनाच्या विषयांवर ६ लक्षवेधी

-सदस्यांची सभागृहात सरासरी ८५ टक्के हजेरी

-अभिनंदन, श्रध्दांजलीचे २०० हून अधिक प्रस्ताव

एकूण सदस्य संख्या - ८०

भाजप - २७

शिवसेना - १५

एमआयएम - ०३

भाजप स्विकृत - ४

शिवसेना स्विकृत - १

भाजप बंडखोर - ३०

या नगरसेवकांनी सर्वाधिक उपस्थित केले प्रश्न

नितीन लढ्ढा - ७

चेतन सनकत - ५

नवनाथ दारकुंडे - ३

Web Title: Jalgaon residents' expectations dashed: 69 councilors including Opposition leaders become 'Maunibaba'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.