ठेक्याचा राजकारणात जळगावकरांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:35+5:302021-06-30T04:11:35+5:30

शहरातील विविध प्रश्न सोडविण्यास मागच्या सत्ताधाऱ्यांना पुर्णपणे अपयश आले होते. आता महापालिकेत सत्तांतर झाले असून, आता तरी समस्यांचा ...

Jalgaon residents have been waiting for the contract in politics | ठेक्याचा राजकारणात जळगावकरांची लागली वाट

ठेक्याचा राजकारणात जळगावकरांची लागली वाट

Next

शहरातील विविध प्रश्न सोडविण्यास मागच्या सत्ताधाऱ्यांना पुर्णपणे अपयश आले होते. आता महापालिकेत सत्तांतर झाले असून, आता तरी समस्यांचा निपटारा होईल का ? असा प्रश्न आता जळगावकर उपस्थित करत आहेत. कारण, गेल्या वेळी सत्तेत असणारे अर्ध्याहून जास्तीचे नगरसेवक आता शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे पक्षाचे नाव जरी बदलले असले तरी नगरसेवक मात्र तेच आहेत. त्यात मनपातील प्रत्येक नगरसेवक या - ना त्या ठेक्यासाठी इच्छुक असल्याने मनपातील सर्व राजकारण हे ठेक्याभोवतीच फिरत असल्याचे दिसून येत आहे. ठेका हा कोणत्याही नगरसेवक किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला तरी जळगावकरांना त्यात ‘इंट्रेस्ट’ नसतो. मात्र, त्या ठेकेदाराने घेतलेले काम गुणवत्तापुर्वक करण्याची अपेक्षा ही जळगावकरांची असते. मात्र, ठेकेदारांकडून ही कामे व्यवस्थित होत नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. शहरातील मध्यंतरी तयार करण्यात आलेले दुभाजक आज जळगावकरांचे त्रास वाढविणारे ठरत आहेत. त्यात काही दुभाजक तर काही महिन्यातच तूटून पडत आहेत. तर आता ॲलमच्या ठेक्यात ही काही नगरसेवकांचा ‘इंट्रेस्ट’ असल्याने मनपाचे नुकसान झाले तरी चालेल मात्र हा ठेका मिळविण्यासाठी नगरसेवक पुढे असतात. शिवाजीनगर उड्डाणपुलालगत विद्युत खांब हटविण्याचा कामाचा ठेका घेण्यासाठी ‘सुर्यमालेतील काही ग्रह’ इच्छुक होते. हे काम महावितरण नाही तर मनपाकडून व्हावे यासाठी मनपात ठराव करण्यात यावा म्हणून या ‘ग्रहांनी’ आमदारांसोबत देखील भांडण केले होते. या ग्रहांच्या वैयक्तिक फायद्यासाठी पुलाचे काम मात्र लांबतच गेले, अखेर हे काम महावितरणकडूनच होणार आहे. हाच प्रकार नालेसफाईत देखील आहे. नालेसफाईचा ठेका घेण्यासाठी अनेक नगरसेवक नेहमी रांगेत असतात, किंवा दुसऱ्या ठेकेदाराकडून हिस्सा घेण्यासही मागे राहत नाही. मात्र, कामात कोणतीही बोंब पाडली जात नाही. वॉटरग्रेसमध्ये देखील अनेकांचे लांगेबांधे असल्याने त्यावर बोलायला कोणीही तयार नाही. मग शहरात कचऱ्याचे ढीग तयार होवोत की मग नागरिक कचऱ्यात जावोत, मात्र आपले लोकप्रतिनिधी या कचऱ्यातुन आणि नाल्यातील गाळातूनही आपला वैयक्तिक फायदा करून घेण्यास मागे पुढे पाहणार नाही.

अजय पाटील (महापालिका)

Web Title: Jalgaon residents have been waiting for the contract in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.