दहावीमध्ये जळगावचा निकाल ९३.५२ टक्के
By अमित महाबळ | Published: June 2, 2023 02:13 PM2023-06-02T14:13:06+5:302023-06-02T14:14:54+5:30
शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये जळगावचा इयत्ता बारावीप्रमाणे दहावीचा निकाल देखील सर्वाधिक लागला आहे.
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी, घोषित करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचा निकाल ९३.५२ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये जळगावचा इयत्ता बारावीप्रमाणे दहावीचा निकाल देखील सर्वाधिक लागला आहे.
जळगाव जिल्ह्यातून ५६,२३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५,९२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून उत्तीर्ण परीक्षार्थी ५२,३०७ असून, त्यांची टक्केवारी ९३.५२ एवढी आहे. निकालात विशेष प्राविण्य मिळविणारे २१,१७६ विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीमध्ये १९,८३७, द्वितीय ९,७३१ आणि उत्तीर्ण श्रेणीत १,५६३ विद्यार्थी आहेत. याही निकालात मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.५९ टक्के तर मुलांचे ९१.८९ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात २.२ टक्क्यांनी घट झाली आहे. निकालाची आकडेवारी सन २०२२ मध्ये ९५.७२ टक्के होती, तर आता ९३.५२ टक्के आहे.
गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार
- ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ही सुविधा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शाळांमार्फतही अर्ज करता येणार आहे.
- उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत येणे अनिवार्य असून, ती मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधारसाठी इच्छूक विद्यार्थ्यांसाठी दि. ७ जून पासून मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होतील.
- गुणपडताळणीसाठी दि. ०३ ते १२ जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी दि. ३ ते २२ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
गुणपत्रिका बुधवारी मिळणार
- विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या शाळेमार्फत बुधवारी (दि. १४) दुपारी ३ वाजता वितरित करण्यात येणार आहेत.