जळगाव : जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव
By अमित महाबळ | Published: April 6, 2023 04:05 PM2023-04-06T16:05:27+5:302023-04-06T16:05:48+5:30
द्वितीय आणि तृतीय वर्ष बी.एसस्सी ओल्ड पॅटर्न हायब्रीड अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही.
जळगाव - द्वितीय आणि तृतीय वर्ष बी.एसस्सी ओल्ड पॅटर्न हायब्रीड अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही. काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवलेले असून, त्यासमोर ‘आर.आर.’ अशी नोंद केलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत.
विद्यार्थ्यांची परीक्षा दि. २५ जानेवारी २०२३ च्या आधी झाली आहे तरीही आजपावेतो अनेक विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाही. निकाल राखीव असलेल्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर ‘आर. आर.’ अशी नोंद कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील परीक्षांचे अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे या प्रकरणी विद्यापीठाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, द्वितीय आणि तृतीय वर्ष बी.एसस्सी ओल्ड पॅटर्न हायब्रीड अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल लागले आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवलेले आहेत. त्यांच्या नावासमोर ‘आर. आर.’ अशी नोंद आहे. या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारले जातील, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, अशी माहिती परीक्षा विभागाचे प्रमुख. प्रा. दीपक दलाल यांनी दिली.
विधी शाखेच्या निकालासाठी सिनेट सदस्याचे निवेदन
विधी शाखेच्या निकालातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येचा मुद्दा गेल्या महिन्यापासून गाजत आहे. विद्यार्थ्यांनी दोन वेळा विद्यापीठात जाऊन तक्रार केलेली आहे. सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी परीक्षा विभागाच्या प्रमुखांना निवेदन देत विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.
अनेक विद्यार्थी परीक्षा हजर असूनही त्यांना गैरहजर दाखविण्यात आले आहे, रिचेकिंग निकाल जाहीर केल्याचे एसएमएस येऊन देखील अद्याप निकाल विद्यार्थ्यांना मेलवर आलेले नाहीत, संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यानंतर परत मागे घेण्याची वेळ वारंवार का येते, ज्या विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केला आहे, त्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी, आदर्श उत्तरपत्रिका देण्यात यावी, निकालातील घोळ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना यावर्षी सर्व विषयांचे फोटो कॉपी व रिचेकिंगची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.