जळगावात अफवांचे ‘लाल भूत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 03:13 PM2017-09-04T15:13:54+5:302017-09-04T15:14:19+5:30
अंधश्रद्धा : अनेकांच्या घरांवर लटकल्या लाल बाटल्या
ऑनलाईन लोकमत / हितेंद्र काळुंखे
जळगाव : शहरातील मेहरुणसह अनेक कॉलन्यांमध्ये वेगवेगळ्या अफवांना बळी पडत घरोघरी लाल रंगाचे पाणी भरलेल्या पाण्याच्या बाटल्या दरवाजा अथवा गेटवर लटकवल्या जात आहेत. गेल्या महिन्याभरपासून हा प्रकार सुरु असून हळूहळू हे अफवेचे भूत विविध भागात पसरत आहे.
या विचित्र प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरात फेरफेटका मारला असता तीन वेगवेगळी कारणे यामागे आढळली. मात्र ज्या उपायासाठी घरासमोर बाटली लावली त्याबाबत काही फायदा झाल्याचे कोणीही सांगू शकले नाही. असे असतनाही ‘या’ बाटल्या अनेकांच्या गेटचा अर्थात मनाचा ताबा घेवून बसल्या आहेत.
कुत्रे दूर सारण्यासाठी ‘लाल आधार’
सुरुवातीस बाटलीचा हा ‘लाल प्रयोग’ मु. जे. महाविद्यालय लगतच्या उच्चभ्रू भागात भूषण कॉलनीत जवळपास दीड महिन्यापूर्वी सुरु झाला. कोणीतरी सांगितले की, लाल रंगाचे पाणी भरलेली बाटली घराच्या गेटवर लावली तर कुत्रे भूंकत नाहीत. येथून जवळच असलेल्या लक्ष्मीनगर भागात काही ठिकाणी लाल रंगाच्या चिंध्या याच कारणासाठी बांधलेल्या दिसून आल्या. हाच प्रकार मेहरुण भागात पोहचला. कुत्रे घाण करु नये म्हणून या ठिकाणी लाल रंगांच्या पाण्याच्या बाटल्या घरोघरी लावलेल्या दिसल्या.
.. आणि बाटल्या निघू लागल्या
या बाटल्या काही भागात पोहचत असतानाच पूर्वीच्या ठिकाणी काहीच उपयोग होत नसल्याचे लक्षात येताच काहींनी या बाटल्या काढून टाकल्याचेही सांगितले. मू.जे.महाविद्यालयाजवळील भूषण कॉलनीत कुत्रे दूर ठेवण्यासाठी बाटल्या लावल्या, मात्र अनेक दिवसात काहीच उपयोग न झाल्याने हळू हळू काहींनी बाटल्या काढून टाकल्या
कुत्रा पळविण्यासाठी लाल बाटलीचा आधार अनेकांनी घेतला असताना प्रस्तुत प्रतिनिधीस मु.जे. जवळील एका अपार्टमेंटच्या पार्क्ीग झोन मध्ये लाल बाटली जवळच एक कुत्रा बसलेला दिसून आला. त्यामुळे लोकांचा हा समज चुकीचाच असल्याचे लगेच दिसून आले.
मेहरुणलगतच्या रेणुका नगरात वेगळ्या कारणामुळे अफवा पसरल्या आहे. एक महिला रात्री घरात शिरते व ती घरातील महिलेल्या डोक्यावर हात फिरवते. असे करताच महिलेचे केस गायब होतात आणि महिलेचा मृत्यू होतो. यापासून वाचण्यासाठी घरावर लाल रंगाच पाणी असलेली बाटली लटकवली तर हा धोका टळतो, अशी चर्चा या परिसरात पसरल्याने बहुतांश महिलांनी अशा बाटल्या लटकवलेल्या आहेत. एवढेच नाही तर काही जणांकडून चोटीवाला बाबा घरात शिरतो आणि महिलेचा जीव घेतो, अशीही अफवा या भागात पसरली आहे.
काही महिला म्हणतात ही तर अंधश्रद्धा
रात्रीतून केसं उडाल्याने किंवा चोटीवाल्या बाबामुळे कुठे महिलेचा मृत्यू झाल्याचे माहीत आहे का? असा प्रश्न रेणुकानगर भागात काही महिलांना विचारला असता कोणीही माहिती देवू शकले नाही. केवळ कानोकानी हा प्रकार पसरला आणि महिला त्यास बळी पडल्याचे दिसून आले. याच भागातील शारदा वाघ, कविता विजय ढगे, शोभा किसन चौधरी आदींनी सांगितले की, अशा प्रकारांवर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा होय. आम्ही बाटली लटकवली नसली तरी आम्हाला काहीही वाईट अनुभव आलेला नाही.
एखाद्या भितीपोटी किंवा फायद्यापोटीही अफवा पसरते. एखादी गोष्ट केल्यानंतर काही नुकसान नसेल तर ती गोष्ट करुन बघायला काय हरकत आहे. अशीही अनेकांची मानसिकता असते याच मानसिकतेतून अशा गोष्टींना खतपाणी मिळते. तेव्हा प्रत्येक गोष्ट ही बौध्द्धीक दृष्टीकोन ठेवून अर्थात डोळसपणे स्विकारायला हवी.
-डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचार तज्ज्ञ
कुत्र्यांना पळविण्यासाठी लाल रंगाचा धाक दाखविला जात असला तरी कुत्र्यांना कोणत्याही रंगाची भिती वाटत नाही.कुत्रा फक्त पांढरा आणि काळा रंग ओळखतो. कुत्र्यांमध्ये वास आणि ऐकणे या शक्ती प्रचंड प्रमाणात असतात.
-विकास पाटील, डॉग ट्रेनर व ब्युरिस्ट
केवळ ऐकीव माहितीवर लगेच विश्वास ठेवणे चुकीचे आहे. अमूकने असे केले म्हणून आपणही तसेच करावे, हा अंध प्रकार असतो. ‘लाल बाटली’ व लाल कपडय़ाबाबतचा हा प्रकार चुकीचाच असून निर्थक आहे. याबाबत त्या त्या भागात जावून प्रबोधन केले जाईल.
-डी. एस.कटय़ारे, जिल्हा कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निमरूलन समिती