जळगावात वाळू डंपरच्या धडकेत स्वयंपाकी कारागिराचा हात निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:20 PM2018-05-06T13:20:06+5:302018-05-06T13:20:06+5:30
महिलाही जखमी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ६ - लग्नाची आॅर्डर असल्याने स्वयंपाकाचे भांडे घेण्यासाठी जात असलेल्या कारागीराच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने जोरदार धडक दिली. त्यात अर्जुन लादूदास वैष्णव (२४ रा, कांचननगर) या दुचाकीस्वार कारागिराच्या हातावरुन चाक गेल्याने हाताचा तुकडा पडला. तर मागे बसलेल्या कविता आनंद कोळी (२५, रा. मोहन टॉकीजजवळ) या जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हा दूध संघाजवळ घडला. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दैव बलवत्तर असल्याने दोघे बचावले
अर्जुन वैष्णव व कविता कोळी हे स्वयंपाकी कारागिर असून त्यांना लग्नाची आॅर्डर मिळाल्याने ते खोटेनगरकडे स्वयंपाकाचे भांडे घेण्यासाठी दुचाकीवर (एमएच१९ सीबी ०७९९) जात होते. ते दूध फेडरेशनजवळ पोहचले असताना मागून वाळूने भरुन येणाºया भरधाव डंपरने (एमएच १९ वाय ३७५७) दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील कविता कोळी या दूर फेकल्या गेल्या तर अर्जुन वैष्णव हा तरुण दुचाकीवरुन खाली कोसळला. यात तरुणाच्या डाव्या हातावरुन वाळूने भरलेल्या डंपरचे चाक गेल्यामुळे तो तरुण गंभीर जखमी झाला. यात त्याचा अर्धा हात पूर्णपणे निकामी झाला. डाव्या हातासह तरुणाच्या उजव्या हाताला, चेहºयावरही मार लागला आहे. अपघातात महिला दूर फेकली गेल्याने व तरुणाचेही दैव बलत्तर म्हणून ते बालंबाल बचावले, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तरुणाच्या हाताचा चुराडा झाल्याने त्याचा अर्धा हात काढावा लागला. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
वाळू वाहतुकीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त
अपघात होताच संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपरवर दगडफेक करीत त्याची तोडफोड केली. वाळू वाहतुकीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून अशा जीवघेण्या घटनांमुळे परिसरात भीती पसरली आहे. अपघातानंतर चालक डंपर सोडून पसार झाला. त्यामुळे नागरिक अधिक संतापले.