शिक्षकाने बदलले थेवापाणी शाळेचे रुप...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 04:46 PM2018-09-04T16:46:35+5:302018-09-04T16:46:49+5:30
अवघ्या चार महिन्यापूर्वी गावाच्या शाळेत बदलून आलेल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेशी लळा लावला असून ग्रामस्थांनीही परिवर्तनाचा वेध घेतला आहे.
- रमाकांत पाटील
नंदुरबार - एखाद्या शिक्षकाने ठरवले तर खऱ्या अर्थाने गावात सुधारणा करू शकतो याची प्रचिती थेवापाणी, ता.तळोदा येथील ग्रामस्थ घेत आहेत. अवघ्या चार महिन्यापूर्वी गावाच्या शाळेत बदलून आलेल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेशी लळा लावला असून ग्रामस्थांनीही परिवर्तनाचा वेध घेतला आहे.
थेवापाणी हे सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील पाडा. तळोदा तालुक्यातील केलीपाणी या गावाचा जेमतेम ३०० लोकवस्तीचा हा पाडा. या गावाला जाण्यासाठी अद्याप कुठलाही रस्ता झालेला नाही. टाकली या गावापर्यंत जेमतेम दुचाकी वाहन जाते. तेथून डोंगरदºयात आठ किलोमीटरची पायपीट केल्यानंतर या गावाला पोहोचता येते. रस्ता प्रचंड चढउताराचा असल्याने येथे पोहोचण्यासाठी अक्षरश: दमछाक होते. याठिकाणी पूर्वी काटेरी झाडे (निवडूंग) होते. त्याठिकाणी पाण्याचा झरा होता. लोक तेथे पाणी घेण्यासाठी जात असत. त्यावरूनच या गावाचे नाव थेवापाणी झाले. अर्थात थेवा म्हणजे त्यांच्या स्थानिक भाषेत काटेरी झाडे. याठिकाणी पूर्वी शाळा नव्हती.
वस्तीशाळा सुरू झाली. त्याचेच रुपांतर १० वर्षापूर्वी जिल्हा परिषद शाळेत झाले. गावातील एका झोपडीत ही शाळा सुरू आहे. पूर्वी येथे अनियमित शाळा असल्याने शाळेत जेमतेम विद्यार्थी. यावर्षी शाळेच्या पटावर १६ विद्यार्थी आहेत. याच शाळेवर जून महिन्यात एक ध्येयवेडा शिक्षक चंद्रकांत सपकाळे यांची बदली झाली. सपकाळे यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी शाळेत जाताच पहिल्या दिवसापासून शाळेच्या कामात झोकून दिले. याठिकाणी रस्ता नसल्याने व पायपीट करून जावे लागत असल्याने सपकाळे यांनी सोमवारी सकाळी शाळेवर पोहोचल्यानंतर तेथेच शनिवारपर्यंत मुक्कामी राहतात. पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वत: जाऊन शाळेत बोलविले. विद्यार्थ्यांचा निरुत्साह व मरगळ झटकण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू केले.
सर्व मुलांना गावाजवळीलच नाल्यावर नेवून आंघोळ घातली. त्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत गणवेश दिले. शिवाय स्वखर्चाने टाय आणि बेल्ट दिले. पाट्या दिल्या. विद्यार्थ्यांची शाळेविषयी गोडी वाढवली. अवघ्या महिनाभरात या विद्यार्थ्यांना शाळेचा इतका लळा लागला की ११ वाजता भरणारी शाळा सकाळी नऊलाच भरते. शिक्षक शाळेतच मुक्कामी राहत असल्याने नऊलाच शाळा सुरू होते. ग्रामस्थांमध्येही या शिक्षकाविषयी प्रेम वाढले. सपकाळे तेथेच मुक्कामी राहत असल्याने शाळा सुटल्यानंतर प्रत्येक पालक व ग्रामस्थांच्या घरी जाऊन चर्चा करतात, वेगवेगळ्या विषयांचे मार्गदर्शन करतात. त्यामुळे ग्रामस्थही त्यांच्यावर प्रेम करतात. परिणामी रोज त्यांना ग्रामस्थांकडूनच जेवण दिले जाते. शाळेला इमारत नसल्याने आता ग्रामस्थांनी इमारत बांधण्याचाही संकल्प केला असून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे.
आमच्या गावाची शाळा अतिदुर्गम भागात असल्याने याठिकाणी पूर्वी दुर्लक्ष होते. पण सपकाळे गुरुजी शाळेतच मुक्कामी राहत असल्याने त्यांनी शाळा बदलली. आता आम्ही शाळेसाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून मिळणाºया रकमेतून येथे शाळा बांधली जाणार नाही. त्यासाठी ग्रामस्थ श्रमदान करणार असून गावातच तात्पुरती वीटभट्टी सुरू करणार आहे.
-बोखा पाडवी, ग्रामस्थ, थेवापाणी, ता.तळोदा.