जळगावात एकाच दिवसात ६०० दुचाकी व ३०० चारचाकींची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:03 PM2018-10-11T13:03:02+5:302018-10-11T13:04:20+5:30

घटस्थापनेचा मुहूर्त

In Jalgaon, selling 600 bikes and 300 charts in a single day | जळगावात एकाच दिवसात ६०० दुचाकी व ३०० चारचाकींची विक्री

जळगावात एकाच दिवसात ६०० दुचाकी व ३०० चारचाकींची विक्री

Next
ठळक मुद्देमोबाईल, एलईडीलाही चांगली मागणीपितृपक्ष संपतापच सुवर्ण बाजारात उत्साह

जळगाव : नवरात्रोत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून बाजारात वाहन खरेदी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचीही मोठी लगबग दिसून येत आहे. घटस्थापनेचा मुहूर्तावर ६०० दुचाकी तर ३०० चारचाकींची विक्री झाली. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स बाजारात या वेळी एलईडी व मोबाईलला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. पितृपक्ष संपताच सुवर्ण बाजारातही खरेदीचा पहिल्या दिवसापासून उत्साह दिसू लागला आहे.
साडेतीन मुहूर्तांसह अनेकजण घटस्थापनेलाही विविध वस्तू खरेदी करतात. त्यानुसार अनेकांनी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंचे बुकिंग केलेले होते. घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासूनच दुकानांमध्ये सुरू झालेली गर्दी रात्रीपर्यंत कायम होती.
मनाजोगे वाहन व वस्तू मिळाव्या म्हणून मोठ्या प्रमाणात बुकिंग केलेले होते. त्यामुळे बुधवारी घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
योजनांचा अधिक फायदा
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध कंपन्यांकडून वेगवेगळ््या योजना राबविल्या जात आहे. अर्थसहाय्य तसेच भेटवस्तू देण्यासह एक्सचेंज आॅफरही असल्याने याचाही ग्राहक मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत.
यामध्ये एलईडीवर मोठ्या सूट असून १० टक्के रक्कमेचा ग्राहकांना फायदा होत असल्याने एलईडीला सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
चारचाकींना वाढली मागणी
चारचाकींच्या बाजारात मोठी धूम दिसून येत असून गुरुवारी किमान ३०० चारचाकी रस्त्यावर आल्या. शहरातील नामांकित एकाच शोरुमध्ये संध्याकाळपर्यंत तब्बल ८० चारचाकींची विक्री झाली. इतर शोरुमचे मिळून एकूण ३०० चारचाकींची विक्री झाली. चारचाकीमध्ये वाहने कमी पडल्याने ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यामध्ये दसरा, दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात चारचाकींचे बुकिंग झालेले असल्याचीही माहिती देण्यात आली.
६०० दुचाकींची विक्री
शहरातील दुचाकीच्या एकाच शोरुमध्ये २०० दुचाकींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. इतर सर्व शोरुमचे मिळून किमान ६०० दुचाकींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये मोपेड गाड्यांना अधिक पसंती असल्याचेही विके्रत्यांनी सांगितले. रात्री आठ वाजेपर्यंत दुचाकींच्या दालनात खरेदी सुरू होती.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारही गजबजला
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठीही बाजार गजबजला आहे. एलईडीला अधिक पसंती दिसून येत आहे. त्या खालोखाल फ्रिज, वाशिंग मशिनला मागणी आहे. या वस्तूंचेच मोठ्या प्रमाणात बुकिंग झालेले होते.
२०० मोबाईलची विक्री
मोबाईल बाजारातही मोठी धूम असून विविध सुविधायुक्त नवनवीन मोबाईल बाजारात येत असल्याने अनेकजण त्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी एकाच दिवसात तब्बल २०० मोबाईल विक्री झाले.
सुवर्ण खरेदीला झळाळी
पितृपक्ष पक्ष संपताच सुवर्ण खरेदीला झळाळी आली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. सुवर्ण बाजारात पितृपक्षामुळे खरेदीला पाहिजे तसा प्रतिसाद नव्हता. मात्र पितृपक्ष संपून आज घटस्थापनेला सुवर्णबाजारात गर्दी झाली होती. यामध्ये लहान आकाराच्या दागिन्यांना मोठी मागणी होती.

पितृपक्षापेक्षा आता सुवर्ण खरेदीसाठी चांगला उत्साह दिसून येत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर चांगला प्रतिसाद राहिला.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, शहर सराफ बाजार असोसिएशन.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ८० चारचाकींची विक्री झाली. खरेदीसाठी चांगला प्रतिसाद असून ग्राहकांचा उत्साह दिसून येत आहे. काही वाहने कमी पडली.
-उज्ज्वला खर्चे, व्यवस्थापक.

दुचाकी खरेदीसाठी मोठा उत्साह असून आमच्याकडे रात्रीपर्यंत खरेदीसाठी गर्दी होती. आमच्या दालनात बुधवारी एकाच दिवसात २०० दुचाकींची विक्री झाली.
-अमित तिवारी, महाव्यवस्थापक.

इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी असून एलईडी, फ्रीजला जास्त मागणी आहे.
- दिनेश पाटील, विक्रेते.

Web Title: In Jalgaon, selling 600 bikes and 300 charts in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.