जळगावात ‘श्रीराम रथोत्सवा’साठी उसळला श्रीरामभक्तांचा जनसागर!

By अमित महाबळ | Published: November 23, 2023 05:47 PM2023-11-23T17:47:03+5:302023-11-23T17:47:49+5:30

अयोध्येतील श्रीराम मंदिरात पुढील वर्षी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची पार्श्वभूमी जळगावातील यंदाच्या रथोत्सवाला लाभली होती.

Jalgaon Shri Ram Rathotsava | जळगावात ‘श्रीराम रथोत्सवा’साठी उसळला श्रीरामभक्तांचा जनसागर!

जळगावात ‘श्रीराम रथोत्सवा’साठी उसळला श्रीरामभक्तांचा जनसागर!

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या दीडशे वर्षांची परंपरा व ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या भगवान श्रीरामाचा रथोत्सव गुरुवारी, मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावागावातून आलेल्या श्रीरामभक्तांचा जनसागर उसळला होता. जुने गावातील गल्लीबोळा आकर्षक विद्युत रोषणाई, दिव्यांनी प्रकाशमान झाल्या होत्या. रस्ते गर्दीने फुलले होते. आकर्षक रांगोळी, फुलांची रथावरील उधळण या सर्वांच्या निमित्ताने जणू काही दिवाळीच दुसऱ्यांदा साजरी होत असल्याची अनुभूती जळगावकरांनी घेतली.

दरवर्षी कार्तिकी एकादशीला निघणारा जळगावचा श्रीराम रथ हा भारतातील एकमेव असल्याचे म्हटले जाते. तो सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकदाही खंड पडलेला नाही. अयोध्येतील श्रीराम मंदिरात पुढील वर्षी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची पार्श्वभूमी यंदाच्या रथोत्सवाला लाभली होती. त्याचाही उत्साह यंदाच्या कार्यक्रमात दिसून आला.

पहाटेपासून विविध धार्मिक विधी श्रीराम मंदिरात पार पडले, त्यानंतर सकाळी पावणेअकराच्या सुमारास श्रीराम रथाचे महापूजन श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त व विद्यमान पाचवे गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते वेदमंत्र घोषात करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते रथाची महाआरती करण्यात आली. रथावर उत्सवमूर्ती स्थानापन्न झाल्यावर प्रभू श्रीरामाच्या जयघोषात हातांनी रथ ओढण्यास सुरुवात झाली. रथ फुलांनी सजविलेला होता. रथाच्या समोर सनई-चौघडा, झांज व डमरू पथक, भजनी मंडळ, दोन पांढरे शुभ्र अश्व, संत मुक्ताबाईंच्या पादुका आणि त्यामागे श्रीराम रथ होता. प्रसाद म्हणून केळीचे वाटप केले जात होते.

रथाच्या पूजनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, श्रीराम मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे भरत अमळकर, भालचंद्र पाटील, ॲड. सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, दादा नेवे, विवेक पुंडे, रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, तहसीलदार विजय बनसोडे, डीवायएसपी संदीप गावित, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, सीमा भोळे, ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, उद्योजक श्रीकांत खटोड, नंदू अडवाणी, भवानी देवी मंदिराचे त्रिपाठी महाराज, ओंकारेश्वर मंदिर देवस्थानचे दीपक जोशी, माजी नगरसेविका गायत्री राणे, अॅड. शुचिता हाडा, सुनील खडके, विरेन खडके, पिंटू काळे, मुकुंद मेटकर, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, भाजपाच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, अमित भाटीया, बंटी नेरपगारे, पियूष कोल्हे आदी उपस्थित होते. संस्थानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Jalgaon Shri Ram Rathotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव