Jalgaon: जळगाव जिल्हा नाशिक विभागात यंदा तिसऱ्या स्थानी, ९४.८८ टक्के निकाल; मुलींची आघाडी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 08:23 PM2024-05-27T20:23:07+5:302024-05-27T20:23:21+5:30
Jalgaon SSC Exam Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार दि. २७ रोजी, घोषित करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचा निकाल ९४. ८८ टक्के लागला.
- भूषण श्रीखंडे
जळगाव - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार दि. २७ रोजी, घोषित करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचा निकाल ९४. ८८ टक्के लागला. शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी जळगाव जिल्हा 'टॉपर' होता. यंदा निकालाचा टक्का वाढून सुध्दा निकालात जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे.
जळगाव जिल्ह्यातून ५६.१४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५.८८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून उत्तीर्ण परीक्षार्थी ५३,०२८ असून, त्यांची टक्केवारी ९४.८८ एवढी आहे. निकालात विशेष प्रावीण्य मिळविणारे २२,८२७ विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीमध्ये १९,११६, द्वितीय ९,३०१ आणि उत्तीर्ण श्रेणीत १,७८४ विद्यार्थी आहेत. निकालात मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.२० टक्के, तर मुलांचे ९३.८६ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात १.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निकालाची आकडेवारी सन २०२३ मध्ये ९३.५२ टक्के होती, तर आता ९४.८८ टक्के असून नाशिक विभागात जळगाव तिसऱ्या स्थानी आहे.
नाशिक विभागाचा लागलेला निकाल
विभाग...............................टक्के
नाशिक.............................९५.७९
नंदुरबार ......................९५.२८
जळगाव.......................९४.८८
धुळे.................................. ९४.३१