जळगाव एसटी विभागाला शिवमहापुराण कथा पावली; ५४ लाखांची कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 10:56 PM2024-01-23T22:56:37+5:302024-01-23T22:56:48+5:30
पाच दिवसात ८५ हजार किलोमीटर एसटी बस जिल्ह्यातून विविध आगारातून चाळीसगाव येथे धावल्या.
जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंडित प्रदीप मिश्रा यांची १६ ते २० जानेवारीदरम्यान पाचदिवसीय शिवमहापुराण कथा संपन्न झाली. कथेला भाविकांची होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेता जळगाव एसटी विभाग व चाळीसगाव आगाराने जादा एसटी बस फेऱ्यांचे नियोजन केले होते. एसटीच्या या सेवेला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने पाच दिवसात ५४ लाखांचे उत्पन्न जळगाव एसटीला मिळाले आहे.
चाळीसगाव येथील शिवमहापुराण कथेसाठी जळगाव एसटी विभागाने सर्व आगारातून जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले होते. यात प्रत्येक आगारातून ५ बसे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. कथा ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांना गावातून आणून त्यांना कथा स्थळापर्यंत सोडणे पुन्हा कथा संपल्यावर गावी सोडण्याची सेवा पाच दिवस एसटीने दिली आहे.
८५ हजार किलोमीटर बस धावल्या
चाळीसगाव येथे शिवमहापुराण कथेसाठी १ हजार ५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यानुसार पाच दिवसात ८५ हजार किलोमीटर एसटी बस जिल्ह्यातून विविध आगारातून चाळीसगाव येथे धावल्या.
१ लाख २५ हजार प्रवाशांचा प्रवास
चाळीसगाव येथे कथेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाच दिवसात झाली होती. ग्रामीण भागातून भाविकांची मोठी संख्या असल्याने भाविकांसाठी जादा एसटी बस सोडण्यात आल्या. या पाच दिवसात १ लाख २५ हजार प्रवाशांनी एसटीतून शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी प्रवास केला.