जळगावचा मृत्यूदर अजूनही राज्य, देशापेक्षा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:15 AM2021-02-14T04:15:15+5:302021-02-14T04:15:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या घटली आहे. मात्र, सप्टेंबरपासून जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या घटली आहे. मात्र, सप्टेंबरपासून जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर हा २.३८ टक्क्यांवरच स्थिर आहे. हा दर आताही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. गेल्या चार महिन्यांचे चित्र बघता या चार महिन्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी १.९१ टक्के बाधितांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. मे ते सप्टेंबरदरम्यान अधिक झाल्याने मृत्यूसंख्या स्थिर असल्याचे चित्र आहे.
मे महिन्यात जळगावचा मृत्यूदर हा थेट १२ टक्क्यांपर्यंत गेला होता. याचा अर्थ प्रत्येक १०० रुग्णांमागे १२ रुग्णांचा मृत्यू होत होता. हे प्रमाण जसजसे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली तसतसे रुग्ण समोर येत गेल्याने कमी होत गेली. सप्टेंबर महिन्यात हा मृत्यूदर अडीच टक्क्यांपर्यंत आला. ऑक्टोबरपासून मृत्यू घटले मात्र, मृत्यू दर २.३७ आणि २.३८ टक्क्यांच्या पलिकडे ना कमी झाला ना वाढला. तो त्याच ठिकाणी स्थिर आहे. याचे मूळ कारण म्हणजे मे ते सप्टेंबर दरम्यानच एकूण मृत्यूपैकी अधिक मृत्यू झाले आहेत.
गेल्या चार महिन्यात ९२२८ रुग्ण आढळून आले आहेत तर १७७ मृत्यूची नोंद झाली आहे.
अशी तुलना
देशाचा मृत्यूदर : १.४२ टक्के
राज्याचा मृत्यूदर : १.४३ टक्के
जळगावचा मृत्यूदर : २.३८ टक्के
चार महिन्यांची स्थिती
ऑक्टोबर रुग्ण ५०१३, मृत्यू ८३, मृत्यूदर १.६५ टक्के
नोव्हेबर : रुग्ण १३६८, मृत्यू ३२, मृत्यूदर २. ३३ टक्के
डिसेंबर : रुग्ण १२६७, मृत्यू २६, मृत्यूदर २.०५
जानेवारी : रुग्ण १११३, मृत्यू २७, मृत्यूदर २.४२
फेब्रुवारी : रुग्ण ४६७, मृत्यू ९
जळगाव शहर टॉपवर
रुग्णसंख्या, मृत्यू आणि सक्रिय रुग्ण या सर्व पातळ्यांवर जळगाव शहर आघाडीवर असून शहरातील ३०४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या शहरातील मृत्यूच्या २२ टक्के आहे. शहराचा मृत्यूदर हा २.२२ टक्के आहे.