जळगावात विद्यार्थिनीने बारावीच्या पेपर देऊन पित्याला दिला खांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:25 PM2018-03-01T12:25:47+5:302018-03-01T12:27:02+5:30
दोन्ही मुलींनी मुलाची कोणतीही उणीव भासू न देता पित्याला खांदा देऊन अग्नीडागही देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचा सूर
विजयकुमार सैतवाल / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १ - अवघ्या तीन तासांवर बारावीची परीक्षा देण्याची वेळ आली असताना पित्याचा अचानक मृत्यू होऊन दु:खाचा डोंगर कोसळलेल्या आयोध्यानगरातील संजना संजय संचेती या विद्यार्थिनीने दु:खावर मात करीत मोठ्या धीराने बारावीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे परीक्षा झाल्यानंतर संजनाने आपली बहिण अमृतासह पित्याच्या पार्थिवाला खांदा देत दोघींनी मुखाग्नीही दिला. मन हेलावून टाकणारा हा प्रसंग बुधवारी संचेती कुटुंबावर ओढावला व सर्वांनी याबाबत हळहळ व्यक्त करीत या मुलींच्या धाडसाचे कौतुक केले.
व्यापारी संजय शांतीलाल संचेती (४९) हे पत्नी, दोन मुली, आई, भाऊ यांच्यासह आयोध्यानगरमध्ये रहात. त्यांची धाकटी मुलगी संजना हिची बारावीची परीक्षा सुरू असून तिचा आज सकाळी ११ वाजता रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता.
याच दरम्यान बुधवारी सकाळी संजय संचेती हे भुसावळ - जळगाव दरम्यान असलेल्या लोढा नगर येथून जैन साध्वी इंदुबालाजी म.सा. आदी ठाणा ६ यांच्या सोबत जळगावकडे विहार करीत होते. लोढा नगरपासून एक-दीड कि.मी अंतरावर आले असताना सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास संजय संचेती यांना अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. त्या वेळी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
इकडे घरी धाकटी मुलगी बारावीच्या परीक्षेला जाण्याची तयारी करीत होती तेवढ्यात पित्याच्या मृत्यूची वार्ता घरी येऊन धडकली. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांसह परीक्षार्थी संजना हिच्यावरही दु:खाचा डोंगर कोसळला. घरात एकच अकांत सुरू होता. या दुु:खद घटनेने अवघ्या तीन तासांवर आलेली परीक्षा देण्याचाही धीर काही क्षण हरविला. त्यावेळी इतरांनी संजनाचे सांत्वन केले व तीदेखील मोठ्या धीराने उभी राहिली आणि पिताच्याचे पार्थिव घरात ठेवून व आशीर्वाद घेऊन परीक्षेला गेली.
मुलींनीच दिला खांदा
दुपारी दोन वाजता परीक्षा संपल्यानंतर घरी येऊन संजना व तिची मोठी बहीण अमृता यांनी पित्याची सेवा केली व पार्थिवाला खांदा दिला. पुढे वैकुंठधाम येथे अंत्यायात्रा पोहचल्यानंतर तेथे दोन्ही मुलींनी पित्याला मुखाग्नी देत अखेरचा निरोप दिला. या वेळी संपूर्ण वातावरण भावूक होऊन उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
साध्वींना आहार देण्याची इच्छा राहिली अपूर्ण
जैनाचार्य हस्तीमलजी म.सा. यांच्या शिष्या इंदुबालाजी म.सा. आदी ठाणा ६ या बुधवारी जळगावातील जैन भवनकडे विहार करीत असल्याने या दरम्यान असलेल्या आयोध्यानगरातील आपल्या घरी त्यांना आणून आहार देण्यासाठी सकाळपासून संजय संचेती हे साध्वीजींसोबत होते. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याने आहार देण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.
संचेती कुटुंबावरील या अचानक कोसळलेल्या दु:खाच्या प्रसंगी महावीर जैन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बेदमुथा यांनी धाव घेऊन कुटुंबास धीर दिला व संजना हिलादेखील परीक्षेसाठी प्रोत्साहीत केले.
घराण्याला कुलदीपक म्हणून तसेच शेवटच्या क्षणी अग्नीडाग देण्यासाठी मुलगाच पाहिजे, असा साधारणपणे समज असतो. मात्र जळगावातील या दोन्ही मुलींनी मुलाची कोणतीही उणीव भासू न देता पित्याला खांदा देऊन अग्नीडागही देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचा सूर या निमित्ताने उमटत आहे.