Jalgaon: जळगावात सकाळी विद्यार्थी आले, पण दुपारनंतर तेही नाहीत..!
By अमित महाबळ | Published: March 14, 2023 05:39 PM2023-03-14T17:39:26+5:302023-03-14T17:40:17+5:30
Government Employees Strike : जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदात संपात शिक्षक संघटनांनी घेतलेल्या सहभागाचे पडसाद मंगळवारी सकाळपासून शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये बघायला मिळाले.
- अमित महाबळ
जळगाव - जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदात संपात शिक्षक संघटनांनी घेतलेल्या सहभागाचे पडसाद मंगळवारी सकाळपासून शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये बघायला मिळाले. सकाळच्या सत्रात तुरळक संख्येने विद्यार्थी आले होते पण दुपारनंतर तेही दिसले नाहीत. शाळांनी मुलांना शाळेत पाठवू नका, असे आवाहन पालकांना केले होते. मात्र अधिकृत सुटी जाहीर केली नव्हती.
दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमध्ये सकाळच्या सत्रात विद्यार्थी आले होते पण त्यांची संख्या अतिशय कमी होती. एरवी ३० वर्ग लागायचे तेथे आज एक वर्गही मोठा भासत होता. नियमित शिक्षक नसल्याने अस्थायी शिक्षक व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या भरवशावर शाळा, महाविद्यालयांचे कामकाज पार पडले. दुपारनंतर विद्यार्थीच आले नाही. परंतु, अधिकृत सुटी घोषित करण्यात आलेली नव्हती.
यावेळी आधीच खबरदारी
संपामुळे नियमित शिक्षक व कर्मचारी शाळेत उपस्थित राहणार नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर परत घरी जावे लागणार होते. अशावेळी त्यांची जबाबदारी कुणी घ्यायची, यातून पालकांनाही मनस्ताप होतो, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो आदी मुद्दे लक्षात घेऊन शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुलांना शाळेत पाठवू नका, असे आवाहन पालकांना केले होते. प. न. लुंकड कन्या शाळेत विद्यार्थिनींचे नाव नोंदवून घेतल्यावर त्यांना घरी सोडले जात होते.
अन् बारावीची परीक्षाही सुरळीत
संपाचा पहिलाच दिवस आणि बारावीचे दोन सत्रात पेपर कसे घ्यायचे अशा संकटात माध्यमिक शिक्षण विभाग सापडला होता. सोमवारी करण्यात आलेल्या नियोजनानुसार परीक्षा सुरळीत पार पाडण्यात यश आले. शिक्षक संपात असल्याने पूरक व्यवस्था उभी करण्याचे निर्देश होते. जिल्ह्यातील ३७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. जळगाव शहरातील नूतन मराठा केंद्रात केंद्र संचालक हजर होते पण संपामुळे पर्यवेक्षक नव्हते. त्यामुळे विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमातील सहा जणांची मदत घेण्यात आली. धरणगाव केंद्रातही पूरक व्यवस्था करण्यात आली.
अस्थायी शिक्षकांच्या मदतीने पार पडला नववीचा पेपर
ला. ना. शाळेत सात वर्षांपासून दहावीच्या परीक्षेच्या बरोबरीने नववीच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा घेतली जाते. त्यांचा मंगळवारी शेवटचा हिंदी/संस्कृतचा पेपर होता. अस्थायी शिक्षकांच्या मदतीने दुपारी १२ ते ३ वेळेत तो पार पडला. ३६८ परीक्षार्थी होते. नियमित सेवेतील शिक्षक संपावर होते. या विद्यार्थ्यांचे वर्ग १५ मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत भरणार आहेत. त्यामुळे त्यांना दीड महिना अभ्यासासाठी अतिरिक्त मिळेल. संप सुरूच राहिला, तर अस्थायी शिक्षकांच्या मदतीने नववीच्या मुलांना शिकवणे सुरू केले जाईल, अशी माहिती मुख्याध्यापक दुर्गादास मोरे यांनी दिली.