Jalgaon: अभ्यासाचा तणाव असह्य, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यानं संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 01:20 PM2023-10-04T13:20:09+5:302023-10-04T13:20:30+5:30
Jalgaon: रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपलेले असताना तन्मय गजेंद्र पाटील या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव : रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपलेले असताना तन्मय गजेंद्र पाटील (१४, रा. गणेश कॉलनी, जळगाव) या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना समोर आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून ठेवत जीवन संपविले. अभ्यासाच्या ताणावातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
शहरातील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला तन्मय हा गणेश कॉलनी परिसरात आई, वडील ॲड. गजेंद्र पाटील आणि मोठा भाऊ ओम यांच्यासोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात होता. मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपले होते. वडील गजेंद्र पाटील हे रात्री लघुशंकेला उठले असता त्यांना तन्मय जागेवर दिसला नाही. त्यामुळे त्यांनी वरच्या खोलीत जावून पाहिले असता मुलाने गळफास छताला गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. मुलाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली. अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष सोनवणे करीत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.