जळगावात पोलीस अधीक्षकांनी पकडला १० लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:14 PM2018-09-14T13:14:29+5:302018-09-14T13:15:12+5:30
६ ठिकाणी धाडसत्र
जळगाव : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी दुपारी अचानकपणे गुटखा विक्रेत्यांच्या गोदामांची तपासणी केली. गोलाणी मार्केट, मानसिंग मार्केट, चोपडा मार्केट, शाहू नगर व नशिराबाद या सहा ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल १० लाखाच्यावर गुटखा जप्त करण्यात आला आहे. दुपारी साडे तीन ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच पोलिसांकडून कारवाई झाली आहे.
महाराष्टÑात गुटखा बंदी असतानाही शहरात गुजरात व मध्य प्रदेशातून कंटेनरद्वारे मोठ्या प्रमाणात गुटखा आयात केला जातो. शहरात गुटखा किंग यांचे मोठमोठे गोदाम असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन गोदामांची तपासणी केली. गोलाणी मार्केटमधील शिव डिस्ट्रीब्युटर्स येथे शिंदे यांनी तळमजल्यात तब्बल अर्धा तास तपासणी केली. मालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
असा केला पर्दाफाश...
एका चार चाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुरुवारी दुपारी तीन वाजता मिळाली होती. शिंदे यांनी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांना अजिंठा चौकात सापळा लावण्याचे आदेश दिले. वर्णनावरुन हे वाहन चौकातच अडविण्यात आले. तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला. हा गुटखा कोठून आणला याची माहिती काढली असता चालकाने गोलाणी मार्केटमधील शिव डिस्ट्रीब्युटर्सचा पत्ता दिला. त्यानुसार कुनगर व पोलीस अधीक्षक शिंदे तेथे दाखल झाले. तळघरात तपासणी केली असता तीन लाखाच्या जवळपास गुटखा आढळून आला.
या दुकानामध्ये सापडला गुटख्याचा साठा
शिव डिस्ट्रीब्युटरर्स (गोलाणी मार्केट), पंकज पान मसाला सेंटर, लक्ष्मी पान मसाला (मानसिंग मार्केट), विजय मिश्रा (शाहू नगर), संतोष ट्रेडर्स (चोपडा मार्केट) व नशिराबाद येथील गणेश चव्हाण याच्या मालकीच्या बोदवड रस्त्यावरील गोदामात कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरात एकाचवेळी धाडसत्र
शहरातील गुटखा गोदामांची माहिती मिळाल्यानंतर शिंदे यांनी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना या गोदामांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या. वेगवेगळ्या पथकाने एकाच वेळी गोदामांची तपासणी केली.
गोलाणी मार्केटमध्ये दिलीप बदलानी व राकेश बढेजा यांचे शिव डिस्ट्रीब्युटर्स, रेल्वे स्टेशन परिसरातील मानसिंग मार्केटमध्ये पंकज पान मसाला सेंटर, श्री लक्ष्मी पान मसाला सेंटर, शाहू नगरमधील विजय मिश्रा याच्या मालकीचे गोदाम, चोपडा मार्केटमध्ये संतोष ट्रेडर्स व नशिराबाद येथे गणेश चव्हाण याच्या मालकीच्या गोदामात छापे टाकण्यात आले.
सहा ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किमंत १० लाखाच्यावर आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत गुटख्याची किंमत काढली जात होती.
शहर किंवा जिल्हा कुठेही गुटख्याची विक्री होत असेल किंवा गोदामात साठविण्यात आला असेल तर त्याची माहिती नियंत्रण कक्ष किंवा थेट आपल्याला कळवावी. माहिती देणाºयाचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
-दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक