Jalgaon: जरांगे पाटलांना समर्थन; धानवड येथे मंत्र्यांना गावबंदी
By सुनील पाटील | Published: October 28, 2023 08:26 PM2023-10-28T20:26:10+5:302023-10-28T20:26:50+5:30
Jalgaon News: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून तालुक्यातील धानवड येथे मंत्री, आमदार, खासदार व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- सुनील पाटील
जळगाव - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून तालुक्यातील धानवड येथे मंत्री, आमदार, खासदार व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नेत्यांच्या गावबंदी व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाचे फलक शनिवारी लावण्यात आले.
जरांगे पाटलांना समर्थन म्हणून गावबंदी करणारे धानवड हे जिल्ह्यातील चौथे गाव आहे. सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी हा एकमुखी निर्णय घेतला आहे. आरक्षण आता नाही तर कधीच नाही म्हणून हा लढा तीव्र करुन सरकारला ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यानंतर कोणीही मंत्री, नेता गावात येऊ नये किंवा आल्यास त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. फलक अनावरणप्रसंगी संपूर्ण गाव एकत्र जमले होते. घोषणाबाजी करण्यात आली. या गावात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मात्र या लढ्यात पक्ष बाजुला ठेवून समाज म्हणून सर्व एकत्र आले आहेत.