वाळूमाफियांच्या टोळक्यातून शोधले ‘अलीबाबा चालीस चोर’; ४० जणांना बजावल्या नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 03:30 PM2023-10-13T15:30:43+5:302023-10-13T15:31:04+5:30
एक वर्ष मुदतीचे प्रतिज्ञापत्र भरुन घेणार
कुंदन पाटील
जळगाव : वाळूतस्करी उघड केल्यानंतर कायदेशीर कारवाई करुनही अनेक जण पुन्हा या धंद्यात पाय पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जळगाव तहसीलदारांनी वाळू चोरीची सवय जडलेल्या ४० जणांना फौजदारी स्वरुपाची नोटीस बजावली आहे. त्यानुसार या ४० जणांना १० हजारांच्या शपथपत्रावर यापुढे अवैध वाळू उचल करणार नसल्याचे लिहून द्यावे लागणार आहे.
जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांनी गतकाळात वाळूतस्करीत सातत्याने सहभागी असणाऱ्या आरोपींची ‘कुंडली’ काढली. कारवाई करुनही सातत्याने वाळू चोरी करणाऱ्या ४० जणांचा त्यात सहभाग दिसून आला. या ४० जणांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदारांनी फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार नोटीस बजावली आहे.
शपथपत्र लिहून घेणार
या ४० जणांकडून १० हजारांच्या शपथपत्रावर वर्षभरासाच्या मुदतीसाठी शपथपत्र भरुन घेण्यात येणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार १९७३ चे कलम १०७ नुसार तहसीलदार ४० जणांविरोधात प्रक्रिया पार पाडणार आहेत. त्यानुसार त्यांना मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत ४० जणांना शपथपत्र सादर करावे लागणार आहे.
वाळूचा सातत्याने अवैध उपसा करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु पाहणाऱ्या ४० जणांविरोधात फौजदारी संहितेनुसार कारवाई करण्यात येत आहे. शपथपत्र दिल्यानंतरही या गैरप्रकारात त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. -नामदेव पाटील, तहसीलदार