प्रसुत झालेल्या विवाहितेच्या मृत्यूनंतर जळगावात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:59 PM2018-06-05T13:59:27+5:302018-06-05T13:59:27+5:30
दोन दिवसापूर्वीच प्रसूत झालेल्या मनीषा विनोद कोळी (वय २२, रा.कासवे, ता.यावल) या विवाहितेचा शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास मृत्यू ओढवल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करुन हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.५ : दोन दिवसापूर्वीच प्रसूत झालेल्या मनीषा विनोद कोळी (वय २२, रा.कासवे, ता.यावल) या विवाहितेचा शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास मृत्यू ओढवल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करुन हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. यावेळी तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.
कासवे, ता.यावल येथील मनिषा कोळी यांना प्रसुतीसाठी शनिवारी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री साडे नऊ वाजता मनीषा ही प्रसुत झाली. गोंडस अशा मुलीला तिने जन्म दिला. यावेळी मनिषाचे सिझेरियन करण्यात आले होते.
मनिषा हिचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करुन तीव्र संताप केला. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे हे नियंत्रण कक्षातील दंगा नियंत्रण पथकासह दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांची समजूत घातली.