जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम

By Ajay.patil | Published: September 8, 2022 07:21 PM2022-09-08T19:21:54+5:302022-09-08T19:22:22+5:30

राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा बँकेची मनमानी; खासदार उन्मेष पाटलांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार.

Jalgaon The loan amount is mutually deducted from the crop insurance amount of the farmers | जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम

जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम

googlenewsNext

यंदा जास्त तापमान व कमी तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना एकूण ३७५ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, ही रक्कम खात्यात वर्ग झाल्यानंतर अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम घेतली आहे, अशा शेतकऱ्यांची कर्जाची रक्कम परस्पर पीक विम्याच्या रकमेतून सेव्हींग अकांऊटमधून थेट कर्ज खात्यात वर्ग केली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांना साधी विचारणादेखील होत नसल्याचा तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.

याबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी गुरुवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील बँकांना ही रक्कम शेतकऱ्यांना न विचारता किंवा त्यांची परवानगी न घेता कर्ज खात्यात वर्ग करण्यात येऊ नये, अशा सूचना बँकांना दिल्या आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडेही या प्रकरणी दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे.

कर्ज वसूल करण्याची पद्धत सोडून मनमानी कारभार
ज्या शेतकऱ्यांकडे बँकांची कर्जाची रक्कम थकीत आहे. ही रक्कम वसूल करण्याबाबत बँकांकडून संबंधित शेतकऱ्यांकडून ही रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांना नोटीस दिली जाऊ शकते, किंवा शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर बोझा बसविला जावू शकतो. मात्र, शेतकऱ्यांच्या बचत खात्यातील रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्याची तरतूद नाही. विशेष म्हणजे हा नियमच नाही, त्यातच जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांकडून ही रक्कम तर परस्पर वर्ग केलीच जात आहे. मात्र, याबाबत शेतकऱ्यांना विचारले देखील जात नसून, कोणतीही माहिती देखील शेतकऱ्यांना दिली जात नसल्याची माहिती जळगाव तालुक्यातील नांद्रा, गाढोदा येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.

नुकसानभरपाईच्या रकमेतून वर्ग करणे नियमबाह्य - खासदार उन्मेष पाटील
शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली रक्कम ही शेतकऱ्यांना बक्षीस स्वरूपात मिळालेली रक्कम नाही. तर ही रक्कम शेतकऱ्यांनी लावलेल्या केळीचे जास्त व कमी तापमानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईपोटी मिळालेली पीक विम्याची रक्कम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा हा मोबदला आहे. मात्र, त्या रकमेतून शेतकऱ्यांना न विचारता शेतकऱ्यांच्या बचत खात्यातून ती रक्कम कर्ज खात्यात टाकणे हे नियमबाह्य असल्याची प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देखील सूचना दिल्या असून, अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही ही रक्कम परस्पर वर्ग करू नये, अशा सूचना दिल्याची माहिती उन्मेष पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा बँकेकडून अशा प्रकारे शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम वर्ग केली जात नाही. राष्ट्रीयीकृत बँकांकडून अशाप्रकारे रक्कम वर्ग केली जात आहे. राष्ट्रीयीकृत बँका जिल्हाधिकाऱ्यांच्याही सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्हा बँकेकडून अशा प्रकारे रक्कम वर्ग केली जात नाही.
जितेंद्र देशमुख,
कार्यकारी संचालक, जिल्हा बँक

Web Title: Jalgaon The loan amount is mutually deducted from the crop insurance amount of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.