Jalgaon: उकाड्यापासून दिलाशासाठी पाण्यात उतरला, पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ बुडाला
By विजय.सैतवाल | Published: May 25, 2024 10:22 PM2024-05-25T22:22:50+5:302024-05-25T22:23:15+5:30
Jalgaon: म्हशी चारण्यासाठी गेलेला असताना उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून मुर्दापूर धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या हर्षल अशोक चौधरी (१४, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या मुलाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - म्हशी चारण्यासाठी गेलेला असताना उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून मुर्दापूर धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या हर्षल अशोक चौधरी (१४, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या मुलाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, २५ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ हिरावला गेला आहे. यामुळे चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
तालुक्यातील नशिराबाद येथे राहणाऱ्या हर्षल चौधरी याने इयत्ता आठवीची परीक्षा दिली होती. तो गावातीलच इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. हर्षलचे आई-वडील हातमजुरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. शनिवारी हर्षल हा गावातील काही जणांच्या म्हशी घेवून त्या चरण्यासाठी गावाजवळ असलेल्या मुर्दापूर धरणाच्या परिसरात गेला होता. तप्त उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने तो आंघोळ करण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला. मात्र त्याला धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे काही मिनिटात त्याच्या नाका तोंडात पाणी जावून तो पाण्यात बुडाला.
हर्षल पाण्यात बुडत असल्याचे दिसताच नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली व काही ग्रामस्थांच्या मदतीने हर्षलला पाण्यातून बाहेर काढले. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत हर्षल यास मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पाच बहिणी असा परिवार आहे.
उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबाला हातभार
मयत हर्षल चौधरीच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तसेच शाळेला सुट्या असल्यामुळे तो गावातील काही जणांचे गुरे घेऊन चरण्यासाठी नेत होता. शनिवारीदेखील तो मुर्दापूर धरणाजवळ गेला असताना ही दुर्देवी घटना घडली व एकुलता एक मुलगा हिरावला गेला.