जळगाव : तपासकामासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की, पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 03:53 PM2023-04-20T15:53:09+5:302023-04-20T15:53:54+5:30
भवाळे येथे तपासकामासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली.
संजय सोनवणे
चोपडा, जि. जळगाव : तालुक्यातील भवाळे येथे तपासकामासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.
चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पो.हे.कॉ. शिवाजी बाविस्कर, भरत नाईक हे भवाळे, ता. चोपडा येथे एका गुन्ह्याच्या तपासासाठी गेले होते. त्यावेळी संबंधितांचा नातेवाईक छोटू रामलाल कोळी (३५) याने आरडाओरड करीत पोलिसांना धक्काबुक्की केली.
त्याला पोलिस वाहनात बसवत असताना त्याची पत्नी सोनाली कोळी (२६), मंगल रामलाल कोळी (४४), वंदना मंगल कोळी (३९), राहुल मंगल कोळी (२१) यांनीही छोटू यास पोलिसांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वरील पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत.