Jalgaon: ...तर ही वेळ आलीच नसती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:26 AM2023-06-28T10:26:13+5:302023-06-28T10:27:14+5:30
जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज त्यांच्यावर आम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ ...
जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज त्यांच्यावर आम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती. त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे, ते सांगतात तसंच ते करतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे पार पडला. यानिमित्ताने माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत काळे झेंडे दाखविले. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की मोदींमुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. ते पंतप्रधान राहिले तर... अनेक घोटाळे बाहेर येतील, हे लक्षात आल्यामुळे विरोधक सर्व एकत्र आले आहेत.
केळी विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. खान्देशसाठी आयुक्त कार्यालय जळगावमध्ये केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
‘तर तुम्ही हाताखाली का काम केले?’
मी नालायक होतो, तर ४० वर्षे तुम्ही माझ्या हाताखाली काम का केले, असा सवाल आ. एकनाथ खडसे यांनी केला. फडणवीस वैयक्तिक पातळीवर उतरत असून हा त्यांचा बालिशपणा आहे. आरोपांपेक्षा कर्तव्याला महत्त्व द्या, असा सल्ला त्यांनी दिला.
गर्दीसाठी धमकी - जयंत पाटील
nकार्यक्रमासाठी गर्दी व्हावी या हेतूने रेशनकार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचे रेशनकार्ड रद्द करून चार महिने धान्य पुरवले जाणार नाही, असा धमकीवजा संदेश पसरवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.