Jalgaon: नवीन आठ पोलिस ठाण्यांसह तीन दुरक्षेत्रांची होणार निर्मिती
By सागर दुबे | Published: March 10, 2023 09:04 PM2023-03-10T21:04:22+5:302023-03-10T21:05:00+5:30
Jalgaon: जळगाव शहर आणि जिल्ह्याचे वाढते परिक्षेत्र आणि त्या तुलनेत असलेल्या पोलिस ठाण्यांची संख्या पाहता जळगाव जिल्ह्यात आणखी नव्या पोलिस ठाण्याची गरज आहे.
- सागर दुबे
जळगाव : शहर आणि जिल्ह्याचे वाढते परिक्षेत्र आणि त्या तुलनेत असलेल्या पोलिस ठाण्यांची संख्या पाहता जळगाव जिल्ह्यात आणखी नव्या पोलिस ठाण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेता जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांचे विभाजन करून आणखी नव्या आठ पोलिस ठाण्यांसह तीन दुरक्षेत्रांची भर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, असलेल्या पोलिस ठाण्यांची रचना आणि आता वाढती लोकसंख्या याचा मेळ घातला असता जिल्ह्यात नव्या पोलिस ठाण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी सुध्दा शिवाजीनगर येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. आता नवीन पोलिस ठाण्यांसह दुरक्षेत्र निर्मितीसाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अमळनेर, एमआयडीसी, जळगाव शहर, पाचोरा, पारोळा, मुक्ताईनगर, पहुर, मेहूणबारे तसेच भडगाव पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत.
अन्यथा शिस्तभंगाची कारवाई...
नवीन पोलिस ठाणे व दुरक्षेत्र निर्मितीच्या अनुषंगाने संबंधित पोलिस ठाण्यात नेमणूकीस असलेले लेखनिक हवालदार, क्राईम हवालदार आणि गोपनीय हवालदार यांची सोमवार, दि. १३ मार्च रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक बोलविण्यात आली आहे. बैठकीत प्रस्तावासंबंधित माहिती कशी सादर करावयाची आहे, त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. दरम्यान, ज्या पोलिस ठाण्यातील कर्मचारी बैठकीला हजर राहणार नाही, त्यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.
असे असतील नवीन पोलिस ठाणे व दुरक्षेत्र
- अमळनेर पोलिस ठाण्याचे विभाजन करून अमळनेर ग्रामीण व अमळनेर शहर असे दोन पोलिस ठाणे निर्मित होतील.
- एमआयडीसी पोलिस ठाण्याचे विभाजन होवून म्हसावद पोलिस ठाणे निर्मित होईल.
- पाचोरा पोलिस ठाण्याचे विभाजर करून नगरदेवळा पोलिस ठाणे तसेच पारोळा पोलिस ठाण्याचे विभाजन करून तामसवाडी पोलिस ठाणे निर्माण होईल.
- पहुर पोलिस ठाण्याचे विभाजन करून शेंदूर्णी पोलिस ठाणे तर मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे विभाजन होवून कु-हा-काकोडा पोलिस ठाणे बांधले जाईल.
- जळगाव शहर पोलिस ठाण्याचे विभाजन होवून शिवाजीनगर पोलिस ठाण्याची निर्मिती होईल.
- कजगाव, पिलखोड आणि ऐनपूर येथे दुरक्षेत्रांची निर्मिती केली जाईल.