Jalgaon: सरकारला आता खाली खेचण्याची वेळ, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जळगावात आंदोलन
By विजय.सैतवाल | Published: September 2, 2023 05:00 PM2023-09-02T17:00:25+5:302023-09-02T17:01:01+5:30
Rohit Pawar Criticize State Government: जालना येथील लाठीमार प्रकरणाला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जळगावात केली.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - सरकारची हुकुमशाही दिवसेंदिवस वाढतच असून ती आता बस झाली आहे. यापुढे सरकारची मनमानी चालू दिली जाणार नाही, या सरकारला खाली खेचण्याची वेळी आली आहे. जालना येथील लाठीमार प्रकरणाला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जळगावात केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे उपोषणादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारच्या घटनेचा जळगावातील आकाशवाणी चौकात शनिवारी दुपारी निषेध करण्यात आला. या वेळी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.
कोणाच्या आईचे रक्त निघाले तर मुलगा शांत बसेल का?
जालना येथील लाठीमारच्या घटनेचा रोहित पवार यांनी निषेध करीत म्हणाले की, शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या उपोषणावेळी लाठीमार करायची काय गरज होती. तुम्ही येऊन चर्चा करायला हवी होती. मात्र तसे न होता लाठीमार करण्यासह लोखंडी छऱ्यांचा वापर करण्यात आला. ही प्रकार निंदणीय असून याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीमार केल्याचे सांगितले जात असले तरी तसे नसून पोलिसांनी लाठीमार केल्याने दगड मारले असतील, असे पवार म्हणाले. पोलिसांनी महिलांवर लाठीमार केला, यात रक्त निघाले. एखाद्या आईचे रक्त निघाले तर मुलगा शांत बसेल का, असा सवाल त्यांनी केला.
शरद पवार भूमिका ठरविणार
या लाठीमारच्या घटनेविषयी निषेध करण्यासाठी मी सामान्य कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर उतरलो आहे. या घटनेविषयी काय भूमिका घ्यावी, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ठरवतील, असे आमदार पवार यांनी स्पष्ट केले.
ठरवून दिवस निवडला
१ सप्टेंबर हा मराठा सेवा संघाचा स्थापना दिवस असून हा दिवस मुद्दामहून निवडला गेला व त्याच दिवशी कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला. या घटनेची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. सरकारच्या हुकुमशाही धोरणाचा निषेध करीत असून सरकारला धारेवर धरण्याची वेळ आली असल्याचे या वेळी उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले.
फडणवीस यांच्यावर रोष
या निषेध आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अधिक रोष व्यक्त करण्यात आला. लाठीमार करण्यामागे फडणवीस यांचेच डोके असून त्यांच्या आदेशानेच हा लाठीमार झाल्याचा आरोप करण्यात आला.
२० मिनिटे जोरदार घोषणाबाजी
या आंदोलनादरम्यान आमदार रोहित पवार हे येण्यापूर्वी मराठा सेवा संघासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्स्त्यावर उतरले. त्यांनी जवळपास २० मिनिटे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुर्दाबाद, मुर्दाबाद.... सरकार मुर्दाबाद, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, हल्लाबोल हल्लाबोल सरकारवर हल्लाबोल अशा वेगवेगळ्या घोषणा या वेळी देण्यात आल्या.
वाहतूक संथगतीने
आंदोलनावेळी पोलिस दोन्ही बाजूने वाहनांना मार्ग करून देत होते. आकाशवाणी चौकातून वाहने थेट बसस्थानकाकडे न जाऊ देता ती सरळ प्रभात चौकाकडे जाऊ दिली जात होती. त्यामुळे वाहने धिम्यागतीने जात होती. या वेळी रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देण्यात आला.
या आंदोलनामध्ये आमदार रोहित पवार यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर, उपमहापौर कुलभूषण पाटील, मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील, प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, एजाज मलिक, वाल्मीक पाटील, मनीषा पाटील आदी सहभागी झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, त्यांचे सहकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला.