राजीव गांधी प्रगती अभियानात जळगाव अव्वल! १० लाखांचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 05:38 PM2023-04-19T17:38:59+5:302023-04-19T17:40:19+5:30
संजय गांधी निराधार योजना राबविण्यात आणि अनुदान घरपोच वाटप करण्यात जळगावचे महसुल प्रशासन अव्वल ठरले आहे.
कुंदन पाटील
जळगाव : राज्यस्तरीय राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व २०२२-२३ स्पर्धेत जळगावच्या महसुल प्रशासनाला १० लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच ‘सर्वोत्कृष्ट कल्पना’ राबविणाऱ्या एरंडोलचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना ५० हजारांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
संजय गांधी निराधार योजना राबविण्यात आणि अनुदान घरपोच वाटप करण्यात जळगावचे महसुल प्रशासन अव्वल ठरले आहे. विभागीय समित्यांकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच एरंडोल पालिकेचे मुख्याधिकारी विकास रमेश नवाळे यांनी ‘सर्वोत्कृष्ट कल्पना’ राबविल्याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांच्या गटात त्यांना अव्वल पुरस्कार जाहीर झाला आहे. फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून बचतगटांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करण्यात नवाळे यांना यश आले होते. त्याचीच दखल राज्य शासनाने घेतली आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाही भूसंपादन प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल ५० हजारांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रकम कार्यालयीन सुधारणा आणि सुविधांसाठी करावी लागणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.