जळगावात वाहतुकीच्या कोंडीने नागरिक हैराण, अजिंठा चौकात दीड तास कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:38 PM2017-11-26T12:38:58+5:302017-11-26T12:40:34+5:30
चारही दिशांना लागल्या वाहनांच्या रांगा; वाहतूक पोलीस गायब
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26 - शहरातील वाहतुकीच्या कोंडीने नागरिक कमालिचे त्रस्त आहेत. कोंडी दूर करण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजिंठा चौकात वाहनांची प्रचंड कोंडी होत असताना प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. शनिवारी सायंकाळी या चौकात तब्बल दीड तास प्रचंड गोंधळ होता.
अशीच स्थिती सूरत रेल्वे गेटनजीक आहे. गेल्या चार दिवसांपासून दुहेरीकरणाची सेवा सुरु झाली. मात्र वारंवार गेट बंद होत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. नियोजनाचा अभाव व हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे, त्याचा फटका नाहक नागरिकांना बसत आहे.
कोंडी फोडण्यात प्रशासन अपयशी
महामार्गावरील अजिंठा चौकात शनिवारी सायंकाळी पाच ते साडे सहा या दीड तासात तर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांची ही गर्दी व अजिंठा चौकात होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जिल्हाधिका:यांनी 3 महिन्यांपूर्वी सातपुडा शोरुमला लागून असलेले पक्के अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला, मात्र या जागी आता प्रवाशी वाहतूक करणा:या वाहनांचे अतिक्रमण होऊ लागले. त्यामुळे अतिक्रमण व वाहतूक कोंडी दूर करण्याचा हेतूच साध्य झाला नाही. शनिवारी आठवडे बाजार असल्याने शहरात तसेच बाजार समितीत येणा:या वाहनांची संख्या लक्षणिय होती. असे असतानाही अजिंठा चौकात डय़ुटीवर फक्त एकच वाहतूक शाखेचा एकच पोलीस कर्मचारी हजर होता, त्यामुळे ही कोंडी दूर करताना त्याचेही नाकीनऊ आले.
नाईलाजास्तव वाहनांनी मार्ग बदलला..
भुसावळकडे कालिंका माता चौक, अजिंठाकडे बाजार समिती, शहराकडे एस.टी.वर्कशॉप तर धुळ्याकडेही एक कि.मी.र्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी असल्याने अनेक एस.टी.बसचालकांनी महामार्गावरुन न जाता पांडे चौक, नेरी नाका व एस.टी.वर्कशॉप यामार्गे जाणे पसंत केले, त्यामुळे वाहतुकीची आणखीनच कोंडी झाली. प्रवेश नसताना या बसेस शहरातून गेल्या.
अवजड वाहनांमुळे रहिवासी त्रस्त
शिवाजीनगर पूल बंद असल्याने यावल, चोपडाकडे तसेच विदगावसह इतर गावांकडे जाणा:या बसेसही सूरत रेल्वे गेट या मार्गाने जात असतात़ तसेच डंपर, ट्रक, मालवाहू ही अवजड वाहने याच मागाने ये-जा करतात़ मुक्ताईनगर, गुड्ड राजानगर, एसएमआयटी कॉलेज परिसर, गुजराल पेट्रोलपंप भागातील रस्त्यांवरुन वाहनांचा वावर आह़े यामुळे रस्त्याची प्रचंड दैना झाली असून वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचा त्रास वाढला आह़े अपघातांच्या भितीने लहान मुलांना दिवसभर घरात कोंडून ठेवावे लागत़े