Jalgaon: टायर फुटल्याने ट्रॅव्हल्स उलटली, सहा जण जखमी, महामार्गावर पाळधी येथील घटना
By विजय.सैतवाल | Published: April 27, 2024 03:09 PM2024-04-27T15:09:32+5:302024-04-27T15:11:54+5:30
Jalgaon Accident News: धावत्या खासगी ट्रव्हल्सचे टायर फुटून ती उलटल्याने सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात महामार्गावर पाळधी येथे शनिवार, २७ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - धावत्या खासगी ट्रव्हल्सचे टायर फुटून ती उलटल्याने सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात महामार्गावर पाळधी येथे शनिवार, २७ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात एका जणाचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
सुरत येथून शुक्रवारी संध्याकाळी सुरत - अकोला ही खासगी ट्रव्हल्स निघाली होती. शनिवार, २७ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात तिचे टायर फुटले व ती उलटली. या अपघातात पठाण गफार खान (४६, रा. सुरत) यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. या सोबतच कौतिक सुपडा गवळी (५०, रा. सुरत), सोनू अंकुश मिस्तरी (२७, सुरत), आशाबाई सुभाष भोसले (४५, रा. सुरत), विद्या स्वामी निकडे (४०), अर्चना स्वामी निकडे (१२, रा. बुलढाणा) हे जखमी झाले.
प्रवासी झोपेत अन् बस उलटली
सकाळी ट्रॅव्हल्स उलटली त्या वेळी अनेक प्रवासी झोपेत होते. बस उलटून अपघात होताच प्रवासी भयभीत झाले व आपल्या सोबतच्या मंडळींना काही झाले तर नाही ना, या चिंतेत पडले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ट्रॅव्हल्स उलटल्याने त्यातील साहित्यही अस्ताव्यस्त पसरले होते. अपघातानंतर प्रवासी रस्त्याच्या कडेला बसून होते. नंतर ते अन्य वाहनाने रवाना झाले.
अपघातस्थळी पोहचले पालकमंत्री
अपघात झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केले. घटनास्थळी पाळधी दूरक्षेत्र पोलिसही पोहचले होते.