रेल्वेत प्रकृती खालावलेल्या मणिपूरच्या नृत्य शिक्षकावर जळगावात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:07 PM2018-11-25T13:07:40+5:302018-11-25T13:07:58+5:30
लातूर येथून राष्ट्रीय बाल महोत्सवाहून परतत असताना ओढवले संकट
जळगाव : लातूर येथे झालेल्या राष्ट्रीय बाल महोत्सवातून विद्यार्थ्यांसह मणिपूरकडे पतरणारे मोहेंद्र वांगक्षेम मयूम (५६, रा. फाऊपाल) या मणिपूर येथील नृत्य शिक्षकाची रेल्वेत अचानक प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर जळगावात उपचार करण्यात आले. ते या संकटातून बाहेर पडले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मयूम यांच्यावर तातडीचे उपचार झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
लातूर येथे झालेल्या राष्ट्रीय बाल महोत्सवात देशातील विविध भागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात मणिपूर येथील शाळेचाही सहभाग होता. मणिपूर येथून १७ विद्यार्थ्यांसह नृत्य शिक्षक मोहेंद्र मयूम, दोन शिक्षिका व एक सहकारी आलेले होते. हा महोत्सव आटोपल्यानंतर ही मंडळी पुणे येथून आझाद हिंद एक्सप्रेसने हावडा येथे जाण्यासाठी निघाले. प्रवासादरम्यान मयूम यांचा रक्तदाब (ब्लड प्रेशर) अचानक वाढला व उलट्याही झाल्या. त्यामुळे शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मयूम यांना घेऊन त्यांचे सहकारी सुरजित मिथाई हे जळगाव रेल्वे स्थानकावर उतरले व मयूम यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. तातडीच्या उपचारामुळे मयूम यांच्या प्र्रकृतीत सुधारणा झाली.
दरम्यान, सोबत असलेल्या १७ विद्यार्थ्यांना शिक्षिकांसोबत हावडाकडे रवाना करण्यात आले.
पंजाब दौरा राहून गेला
पंजाब येथेही एका कार्यक्रमासाठी मयूम यांना जायचे होते. त्यासाठी ते इम्फाळ येथे उतरणार होते व तेथून ते पंजाबला जाणार होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव येथे उतरावे लागले व त्यांचा पंजाब दौरा राहून गेला, अशी माहिती त्यांच्यासोबत असलेले सुरजित मिथाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अधिकारी लक्ष ठेवून
मोहेंद्र मयूम यांना रुग्णालयात दाखल करताच गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी डॉक्टरांना तसेच आवश्यक त्या मदतीसाठी प्रशासकीय अधिकारी अशोक भिडे यांना सूचना दिल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत कांते यांनी तातडीने उपचार केले तर लेखापाल योगेश पाटील, जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यांनी मदत केली.