जळगाव : विद्यापीठाची नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 08:10 PM2024-06-11T20:10:38+5:302024-06-11T20:10:55+5:30

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेले प्रथम वर्षांच्या अभ्यासक्रमांना मान्यता व पेट परीक्षेचे आयोजन यासारखे विविध निर्णय घेण्यात आले.

Jalgaon: University approves new courses | जळगाव : विद्यापीठाची नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

जळगाव : विद्यापीठाची नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

अमित महाबळ, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.११)झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेले प्रथम वर्षांच्या अभ्यासक्रमांना मान्यता व पेट परीक्षेचे आयोजन यासारखे विविध निर्णय घेण्यात आले.

विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात विद्या परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. कुलगुरुंसह, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, विज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.एस. टी. भुकन व मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांच्यासह विविध विद्या परिषद सदस्य बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यास मंडळे व विद्याशाखांनी शिफारस केलेले पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम. बी.एस्सी. सह इतर विद्याशाखेतील विविध वर्गांचे अभ्यासक्रम,तसेच एम.ए., एम.कॉम. व एम.एस्सी. या पदव्युत्तर वर्गांच्या व्दितीय वर्षाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून लागू करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत बी.कॉम. (बीएफएसआय) व भौतिकशास्त्र प्रशाळे अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्कील कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने बी.एस्सी. (ऑनर्स) इलेक्ट्रॉनिक्स (मेजर इन इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स व मायनर इन सोलर फोटोव्होल्टेक सिस्टीम/डेटा सायन्स) हे अभ्यासक्रम वर्ष २०२४-२५ पासून सुरु करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. विद्यापीठाने ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सोईकरिता नंदुरबार येथील ट्रायबल अकादमी येथे समाजकार्य विषयाचा दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.एस.डब्ल्यू.) ६० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह सुरु करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. आजच्या बैठकीत कुलगुरु आंतरवासिता प्रोत्साहन योजना (व्हीसी इंटर्नशिप प्रमोशन स्कीम) नियमावली आणि कुलगुरु संशोधन प्रोत्साहन योजनेची सुधारित नियमावली, शैक्षणिक दिनदर्शिका (ॲकॅडेमिक कॅलेंडर) वर्ष २०२४-२५ यासह विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत विद्यापरिषद सदस्यांनी सहभाग घेतला.
 
जुन्या अभ्यासक्रमांना दुसऱ्या वर्षात प्रवेश
ज्या अभ्यासक्रमांना नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) लागू होणार आहे, त्या प्रथम वर्ष वर्गांच्या जुन्या अभ्यासक्रमानुसार मार्च/एप्रिल/मे २०२४ मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय विद्या परिषदेत पारित करण्यात आला.
 
पेट परीक्षा घेणार...
पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी अनिवार्य असलेल्या प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) आयोजित करण्याबाबत विद्या परिषदेत चर्चा होऊन, पेट परीक्षेचे आयोजन लवकरच करण्यात यावे असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: Jalgaon: University approves new courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव