Jalgaon: विद्यापीठाचे बजेट मांडले, तूट दिसली; पण आचारसंहितेमुळे योजनांवर चर्चा नाही
By अमित महाबळ | Published: March 23, 2024 07:37 PM2024-03-23T19:37:23+5:302024-03-23T19:37:48+5:30
Jalgaon News: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे जमा-खर्चाचे अंदाजपत्रक (बजेट) शनिवारी (दि. २३) अधिसभेत सादर करण्यात आले. २८९.१६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक अधिसभा सदस्यांनी मंजूर केले.
- अमित महाबळ
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे जमा-खर्चाचे अंदाजपत्रक (बजेट) शनिवारी (दि. २३) अधिसभेत सादर करण्यात आले. २८९.१६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक अधिसभा सदस्यांनी मंजूर केले. यात १९.५५ कोटी रुपये तूट दाखविण्यात आली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने विद्यार्थी हिताच्या योजनांची घोषणा व त्यावरील चर्चा टाळण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी होते. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील मंचावर उपस्थित होते. अर्थसंकल्प समितीचे अध्यक्ष ॲड. अमोल पाटील यांनी अंदाजपत्रक सादर केले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे केवळ जमा-खर्चाची आकडेवारी मांडण्यात आली. मात्र, त्यावरील तरतुदींची घोषणा करण्यात आली नाही. दोन सदस्यांनी कपात सूचना मांडली होती. मात्र, नंतर त्या मागे घेण्यात आल्या. सदस्यांनी विद्यार्थी हिताच्या योजनांबाबत विचारणा केली असता, आचारसंहिता लागू असल्याने त्यावर या बैठकीत माहिती देणे, चर्चा करणे शक्य नसल्याचे सभेच्या अध्यक्षांनी सांगितले. आचारसंहिता संपल्यानंतर होणाऱ्या बैठकीत माहिती देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनांचा समावेश अंदाजपत्रकात केलेला आहे. दि. १ एप्रिलपासून त्यावर काम सुरू होईल. परंतु आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता माहिती देता नसल्याचेही ॲड. अमोल पाटील यांनी सांगितले.
...अन् कपात सूचना मागे घेतली
यंदाचा अर्थसंकल्प २८९.१६ कोटी रुपये एवढा असून, तूट १९.५५ कोटी रुपये एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत तूट ४.७५ कोटींनी कमी झाली आहे. या अर्थसंकल्पात परीक्षणासाठी १९६.४६ कोटी, योजनांतर्गत विकासासाठी ४३.५१ कोटी आणि विशेष कार्यक्रम-योजनांसाठी ४९.१९ कोटींची तरतूद आहे. अर्थसंकल्प मांडल्यानंतर अमोल मराठे व प्रा. एकनाथ नेहेते यांनी दिलेल्या कपात सूचनेअंती चर्चा झाल्यानंतर त्यांनी कपात सूचना मागे घेतली. अर्थसंकल्पावर सदस्यांनी सविस्तर चर्चा केल्यानंतर सभागृहाने अर्थसंकल्पाला मान्यता दिली. त्याआधी प्रश्नोत्तरांचा तास झाला. या तासात दीपक पाटील, अमोल मराठे, दिनेश चव्हाण व दिनेश खरात यांच्या प्रश्नांना सीए रवींद्र पाटील, अमोल पाटील, प्रा. अनिल डोंगरे यांनी उत्तरे दिली.