जळगावच्या विद्यापीठाचा निर्णय, पुढील पाच वर्षात नवीन ८९ महाविद्यालये उघडणार
By अमित महाबळ | Published: July 24, 2023 09:01 PM2023-07-24T21:01:36+5:302023-07-24T21:01:46+5:30
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २४) अधिसभेची बैठक झाली.
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्याला अधिसभेने मान्यता देवून शासनाकडे शिफारस केली आहे. या आराखड्यात पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने ८९ महाविद्यालये सुरु करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २४) अधिसभेची बैठक झाली. या बैठकीत प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी सांगितले की, पंचवार्षिक बृहत आराखडा शास्त्रोक्त पध्दतीने तयार करण्यासाठी कुलगुरूंनी २४ सदस्यीय समिती नियुक्त केली होती. या बृहत आराखड्यासाठी पालक, शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते शिक्षण तज्ज्ञ यांच्याकडून लिंकद्वारे प्रश्नावली भरून घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्याही सूचना मागविण्यात आल्यात.
प्राप्त डाटाचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर हा आराखडा तयार करण्यात आला. या भागातील गरजा आणि आदिवासी भाग लक्षात घेवून आराखडा तयार केला गेला आहे. पुढील ५ वर्षांमध्ये तीनही जिल्ह्यातील सकलप्रवेश दर (जीईआर) पाच टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दीष्ट्ये ठेवण्यात आली आहेत. नंदुरबार येथील आदिवासी अकादमीत काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केली जाणार आहेत. विद्यापीठातील कवयित्री बहिणाबाई चौधरी इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲड लिंकेजेस केंद्राच्या वतीने पुढील पाच वर्षात ३० स्टार्ट अप सुरु करण्याचे उद्दीष्टये ठेवली आहे.
या बैठकीत बोलतांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत केले जात असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा सकलप्रवेश दर वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती दिली. अधिसभेच्या बैठकीत प्रा. एकनाथ नेहते, विष्णू भंगाळे, प्रा. जयवंत मगर, नितीन ठाकूर, प्राचार्य एस. एन. भारंबे, प्राचार्य के. बी. पाटील, विलास जोशी, प्रा. अनिल पाटील, डॉ. मंदा गावित, प्रा. अजय पाटील, अमोल मराठे, अमोल सोनवणे, ऋषिकेश चित्तम आदींनी चर्चेत भाग घेवून काही सूचना केल्या.
पुढील पाच वर्षातील प्रस्तावित महाविद्यालये
महाविद्यालय प्रकार - संख्या
नर्सिंग : ०१
फार्मसी : ०२
विधी महाविद्यालय : ०३
रात्र महाविद्यालय : ०४
महिला महाविद्यालय : ०५
कौशल्यवर्धन महाविद्यालय : ३२
कौशल्यज्ञान पुरविणाऱ्या संस्था : ०९
समाजकार्य महाविद्यालय : ११
कला व ललित कला महाविद्यालय : ०८
विशेष शिक्षण शास्त्र महाविद्यालय : ०४
फॅशन डिझाईन महाविद्यालय : ०२
बीएस्सी हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय : ०२