जळगावनजीक भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:10 PM2018-08-25T13:10:16+5:302018-08-25T13:10:57+5:30
बोरनारचे दोघे गंभीर
जळगाव/शिरसोली : शिरसोली प्ऱबो़ येथील एस़टी़ बसस्टॅण्डसमोर भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३़१५ वाजेच्या सुमारास घडली़ अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला़ इब्राहीम रफीक पटेल (वय-१९) व शोएब मणियार (वय-२८, दोन्ही़ रा़ बोरनार) अशी दुचाकीवरील जखमी झालेल्या दोन्ही तरूणांची नावे असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़
बहिणीसाठी शिलाई मशिन घेण्यासाठी बोरनार येथील इब्राहीम हा मित्र शोएब याला सोबत घेऊन शुक्रवारी दुपारी जळगावात दुचाकी (एमएच़१९़एए़१४५३) ने आला होता़ गोलाणी मार्केटमधून शिलाई मशिन खरेदी केल्यानंतर दोन्ही बोरनारच्या दिशने रवाना झाले़ इब्राहीम हा दुचाकी चालवत होता़ तोच चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयातील डॉ़ गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही) हे कार (क्ऱएमएच़१९़ सीयू़३८५४) ने जळगावच्या दिशेने येत होते़ तोच या भरधाव असलेल्या कार व दुचाकीमध्ये शिरसोली प्ऱबो येथील एस़टी़ बस स्टॅण्डसमोर दुपारी समोरासमोर धडक झाली़
अपघातात होताच दुचाकीवरील इब्राहीम हा कारवर आदळला गेला़ तर मागे बसलेला शोएब हा खाली कोसळला़
दुचाकीचालक गंभीर जखमी
कारवर आदळला गेल्यामुळे इब्राहीम याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला़ तर दुसरीकडे दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला़
परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली़ तोच गावातील जिभू पाटील व सुपडू पाटील यांनी जखमी इब्राहीम व शोएब या दोघांना रिक्षातून नेत जिल्हा रूग्णालात उपचारार्थ दाखल केले़ मात्र, अपघात झाल्यानंतर कार व मोबाईल सोडून डॉ़ गायकवाड यांनी तेथून पळ काढला़ यानंतर ग्रामस्थांनी कारची चावी व मोबाईल त्वरीत पोलीस पाटील यांच्याकडे दिली़ या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
शिलाई मशिनचे तुकडे
धडक एवढी जबर होती की शोएब यांच्या हातातील शिलाई मशिनचे दोन ते तीन तुकडे झाले़ कारच्या पुढील भागासह काचेचेही नुकसान झाले आहे़ ग्रामस्थांनी अपघातानंतर त्वरीत एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्याचे जितेंद्र राठोड यांच्यासह काही कर्मचाऱ्यांनी धाव घेतली़ दरम्यान, या अपघातात इब्राहीम यास गंभीर दुखापत झाली आहे़ तर शोएब हा किरकोळ जखमी झाला आहे़ जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर इब्राहीम यास त्वरीत खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले़