अवघ्या १५ मिनिटांच्या पावसात जळगावही तुंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:10+5:302021-06-25T04:13:10+5:30

मनपाचा नालेसफाईचा दावा ठरला फोल; ठिकठिकाणी साचले डबके; उपनाले ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळ्याचा ...

Jalgaon was also flooded in just 15 minutes of rain | अवघ्या १५ मिनिटांच्या पावसात जळगावही तुंबले

अवघ्या १५ मिनिटांच्या पावसात जळगावही तुंबले

Next

मनपाचा नालेसफाईचा दावा ठरला फोल; ठिकठिकाणी साचले डबके; उपनाले ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाळ्याचा तोंडावर दरवर्षी मनपा प्रशासनाकडून नालेसफाईचा दावा केला जात असतो. मात्र, पावसाळ्यात या नालेसफाईचे दावे नेहमी फोल ठरत असतात. यावर्षी तर मनपाने पावसाळा सुरू झाल्यावरदेखील नालेसफाईचे काम पूर्ण केलेले नाही. विशेष म्हणजे उपनाल्यांचा सफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा मनपाकडून केला जात असला तरी मात्र गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास झालेल्या १५ मिनिटांच्या पावसात मनपाचे दावे पूर्णपणे फोल ठरले असून, शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी डबके साचले होते. तर अनेक ठिकाणी उपनाले व गटारी ओव्हरफ्लो होऊन वाहत होत्या.

मनपाकडून नालेसफाईवर दरवर्षी २० लाखांचा खर्च केला जात असतो. यावर्षी कोरोनाचे कारण देत नालेसफाईला उशीर झाला. मात्र, जून महिना संपत आला असताना, ही सफाई पूर्ण झालेली नाही. त्यामुळे केवळ १५ मिनिटांच्या पावसात जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर नाले, गटारीचे पाणी येऊ शकते तर शहरात जोरदार पाऊस झाल्यास नाल्याचे पाणीही घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रश्नाकडे मनपा प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. गुरुवारी अनेक भागात गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागली.

नवसाचा गणपती मंदिर परिसर

शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटकडून नवसाचा गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्याची सफाई पूर्ण झालेली नसल्याने थोडाही पाऊस झाला तरी हा नाला ओव्हरफ्लो होतो. गुरुवारीदेखील पावसामुळे नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे रस्त्यावर नाल्याचे पाणी वाहू लागले. त्यात रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनधारकांना पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज घेणेदेखील कठीण होऊन गेले होते. त्यातच अवजड वाहतुकीमुळे या ठिकाणी रस्ता पूर्णपणे ब्लॉक होऊन गेला होता.

ख्वॉजामिया रस्त्यावर तर नेहमीच पाणी

ख्वाॅजामिया चौक ते ख्यॉजामिया दर्ग्यापर्यंतच्या रस्त्यालगतदेखील मोठ्या प्रमाणात नाल्याचे व गटारीचे पाणी रस्त्यावर येत असते. गुरुवारी थेट छत्रपती शाहू महाराज संकुलापासून ते पेट्रोलपंपालगतच्या रस्त्यापर्यंत गटारीचे पाणी वाहत होते. तसेच सर्व पाणी गटारीचे असल्याने मोठ्या प्रमाणात घाणदेखील रस्त्यावर आल्यामुळे दुर्गंधीदेखील पसरली होती.

२० लाख पाण्यात

मनपा प्रशासनाकडून नालेसफाईवर २० लाख रुपये खर्च केला जातो. मात्र, मक्तेदाराकडून नाल्यातून काढण्यात आलेला गाळ हा नाल्याकाठीच फेकला जातो. काही दिवसात पाऊस झाल्यानंतर हाच गाळ नाल्यांमध्ये जातो व पुन्हा नाले ओव्हरफ्लो होतात. अशाच प्रकारे सफाईचे काम राहिल्यास पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर येते. जोरदार पाऊस झाल्यास मोठ्या नाल्यांना पूर येतो व नाल्याकाठच्या घरांमध्ये पाणी शिरत असते. हीच पद्धत नालेसफाईत सुरू असून, मनपाचे दरवर्षी २० लाख रुपये केवळ पाण्यातच जात आहेत.

Web Title: Jalgaon was also flooded in just 15 minutes of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.