जळगावच्या टरबुजांची होतेय परदेशात निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:18+5:302021-01-02T04:14:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यात पिकणाऱ्या टरबूज आणि खरबुजांची मध्यपूर्वेतील देशांमध्ये मोठी निर्यात होत आहे. ...

Jalgaon watermelon is exported abroad | जळगावच्या टरबुजांची होतेय परदेशात निर्यात

जळगावच्या टरबुजांची होतेय परदेशात निर्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्ह्यात पिकणाऱ्या टरबूज आणि खरबुजांची मध्यपूर्वेतील देशांमध्ये मोठी निर्यात होत आहे. मध्यपूर्वेतील कतार, यूएई, बहरीन यासह अग्नेय आशियातील हाँगकाँग, इंडोनेशिया यासह इतर सात देशांमध्ये जळगावातील टरबुजांचा गोडवा चाखला जात आहे.

जळगावातील डॉ. केदार थेपडे यांची कन्या श्रृती आणि जावई पीयूष तिडके हे जळगावातून टरबूज आणि खरबूज थेट शेतकऱ्यांकडून घेतात आणि त्याची परदेशात विक्री करतात. श्रृती या शेतकऱ्यांना त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञानदेखील पुरवतात. काही शेतकऱ्यांशी त्यांनी शेतमाल खरेदीसाठी करारदेखील केला आहे. परदेशात काळी बी नसलेल्या टरबुजाला मोठी मागणी असते. त्यासाठी विशिष्ट जातीच्या टरबुजांची रोपे, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञानदेखील शेतकऱ्यांना पुरवले जाते.

एका एकरात टरबुजाला साधारणत ५० हजाराचा खर्च येतो. तर एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हा माल शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. त्यानंतर मुंबईला तो कोल्ड स्टोरेजमध्ये साठवला जातो. पुढे कोल्ड कंटेनरमधून जहाजमार्गे हा माल विविध देशांमध्ये पाठवला जातो. पुढे या देशांमध्ये सुपर स्टोअर, मॉल्समधून या मालाची विक्री होते. मध्यपूर्वेतील नागरिकांना भारतातील रसाळ फळांची चव आवडते. त्यामुळे तेथे या मालाला जास्त मागणी असते. तो ताजा मिळावा, यासाठी त्याला विशिष्ट तापमानात ठेवावे लागते.

खरबुजासाठी ८० हजाराचा प्रती एकर खर्च येत असला तरी त्यातून दोन लाख रुपयांचे उत्पन्न होते.

त्यासोबतच कर्नाटक, सांगोला, गुजरात या भागातून डाळिंब घेतले जाते. तर द्राक्ष आणि टमाट्यांचीही निर्यात याच माध्यमातून केली जाते.

फळांना परदेशात मोठी बाजारपेठ

फळांवर योग्य प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास त्याला परदेशात मोठी बाजारपेठ मिळू शकते. भारतीय फळांचा गोडवा मध्यपूर्वेत पसरल्यास त्या निर्यातीचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तसेच शेतकरी आणि ग्राहक यांच्यात कमीत कमी मध्यस्थ असावेत, यासाठी अशा अनोख्या प्रयोगांची भारतातील शेती उद्योगाला गरज आहे.

Web Title: Jalgaon watermelon is exported abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.