जळगावात महिलेने केला चोरट्याचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:58 PM2018-04-16T22:58:20+5:302018-04-16T22:58:20+5:30
२८ हजारांचा ऐवज लंपास करण्यात चोरट्याला यश
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१६ : घरात चोरी करून पसार होणाऱ्या चोरट्याचा एका महिलेने पहाटेच्या सुमारास पाठलाग केल्याची घटना रामानंदनगरातील श्यामनगरात घडली आहे. या घटनेत २७ हजार हजार रुपयांचे दागिने व एक हजार रुपयाचा मोबाइल लांबविण्यात चोरट्याला यश आले आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीता गणेश ढवळे या श्याम नगरातील गट क्र.१९ मध्ये मुलगी योगिता (वय १५) व मुलगा गौरव (वय १२) यांच्यासह वास्तव्याला आहेत. शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते मुलांसह बेडरूमध्ये झोपून गेल्या. पहाटे साडेतीन वाजता घरातील हॉलमध्ये काही तरी हालचाल होत असल्याचा आवाज त्यांना आला. उठून पाहिले असता एक जण घरातील कपाटात काही तरी शोधताना दिसला. चाहूल लागताच तो पळाला.नीता यांनी पाठलाग केला, मात्र काही उपयोग झाला नाही.
नीता यांनी घरात येऊन लाकडी शोकेसची पाहणी केली असता त्यात ठेवलेले १२ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची एक माळ, ८ हजार रुपये किमतीची तीन ग्रॅमची माळ, सात हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅमचे कानातील दागिने व एक हजार रुपये किमतीचा मोबाइल गायब झालेला होता. या घटनेत २८ हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला. नीता ढवळे यांनी यांनी सोमवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली.