जळगावात महिलांनी रोखला मंत्र्यांचा ताफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:25 PM2019-09-08T12:25:12+5:302019-09-08T12:25:24+5:30
वारंवार खंडीत वीज पुरवठ्यामुळे उतरले नागरिक रस्त्यावर
जळगाव : गेल्या वर्षभरापासून शहरातील वाल्मिक नगरात खंडीत वीज पुरवठा होत असून त्याची दखलच घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी या भागातून जाणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफाच रोखून त्यांना घेराव घातल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ऐन गणेशोत्सवात विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी वाल्मिक नगर परिसरातील नागरिकांनी येथील विद्युत ट्रान्सफार्मरची आरती करुन महावितरणचा निषेध केला होता. आता शनिवारी सहकार राज्यमंत्री पाटील हे आसोदा येथे एका कार्यक्रमासाठी याच भागातून जात असल्याचे समजल्याने १०० ते १५० महिलांनी रस्त्यावर बसून त्यांचा ताफा अडविला. विज पुरवठा सुरु केल्याशिवाय मंत्र्यांना या ठिकाणाहून पुढे जाऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला. महावितरणविरोधात घोषणाबाजी केली. मंत्री वाहनातून उतरताच महिलांनी त्यांना घेराव घातला. त्यावेळी एकच गोंधळ उडून तणाव निर्माण झाला होता.
यानंतर मंत्र्यांनी उपस्थित महिलांना सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरु होईल, माझी वाट सोडा, अशी विनंती केल्यावर, महिलांनी त्यांच्या वाहनाच्या ताफ्याला वाट मोकळी करुन दिली. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत महावितरणचा एकही अधिकारी या भागात आलेला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
महिलांनी वर्षभरापासून आमच्या भागात वीज नसल्यामुळे आम्ही कसे जगावे, असा प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त केला. महिलांचा हा संताप पाहून मंत्र्यांनी स्थानिक अभियत्यांना दूरध्वनी वरुन चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे या नागरिकांनी माझीच वाटच अडविली आहे. मला एका कार्यक्रमाला तात्काळ जायचे आहे. आता मी कसा जाणार, तुम्ही यांचा वीज पुरवठा केव्हा सुरु करणार? असे विचारत त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना ताबडतोब घटनास्थळी बोलावले.
तुमच्या सोबत मीच उपोषणाला बसणार
सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरु होण्याचे आश्वासन दिल्यावरही काही महिला मात्र वीज पुरवठा सुरु होईपर्यंत वाट सोडण्यास तयार नव्हत्या. यावेळी मंत्र्यांनी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरु झाला नाही, तर मला परत फोन करा, मीच तुमच्या सोबत या ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मंत्र्यांच्या आश्वासनावर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.