आरोपांकडे दुर्लक्ष करीत जळगाव जिल्हा बँकेकडून अध्यक्षांच्या कारखान्याला ५५ कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:25 PM2020-01-11T12:25:24+5:302020-01-11T12:26:01+5:30
आमदार चंद्रकांत पाटील यांना उत्तर न देता उपाध्यक्षांचा पत्रकारांवरच रोष
जळगाव : जिल्हा बँकेकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहीणी खडसे यांची भागीदारी असलेल्या खाजगी साखर कारखान्यास सत्तेचा दुरूपयोग करून किंमतीपेक्षा जादा कर्ज दिले असून या गैरप्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे दूरध्वनीवरून तक्रार केली असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली. असे असताना शुक्रवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत या कारखान्यास मागणी केलेल्या ८१ कोटी ९६ लाखांपैकी ५५ कोटींचे कर्ज देण्यास मंजूरी देण्यात आली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवारी बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहीणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यास बँकेचे उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, गुलाबराव देवकर, संजय पवार, तिलोत्तमा पाटील यांच्यासह संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील सर्व २० विषय मंजूर करण्यात आले. तसेच आयत्यावेळेत सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज देण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.
उपाध्यक्षांचा पत्रकारांवरच रोष
आमदार चंद्रकांत पाटील यांनी बँकेच्या अध्यक्षांच्याच कारखान्यास किंमतीपेक्षा तिप्पटीचे कर्ज कसे मंजूर होते? सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केल्याने शुक्रवारी होणाºया संचालक मंडळाच्या सभेत याबाबत काय निर्णय होतो? याबाबत उत्सुकता होती. मात्र बँकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे टाळत दरवेळी बँकेच्या हिताच्या विरोधातील मुद्यातच पत्रकारांना रस का असतो? असा आरोप केला. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आरोप केल्याचे निदर्शनास आणून दिल्यावरही त्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही. बँकेच्या हिताचेच निर्णय घेतले असल्याचे सांगितले. बँकेच्या हिताचे विषय करायचे की नाहीत? मुक्ताई कारखान्याच्या कर्जाचा विषय हा बँकेच्या हिताचा विषय आहे. कारण मुक्ताई कारखान्याला दिलेले कर्ज वगळता अन्य सहकारी संस्था, कारखान्यांना दिलेले कर्ज थकीत झाले आहे. एकमेव या कारखान्याकडूनच नियमित परतफेड केली जात असल्याचे सांगितले. त्यासाठी ९० कोटींच्या आसपास किंमत असलेला कारखाना व ५५ कोटींची साखर तारण ठेवली असल्याचे सांगितले.
आरोप राजकीय द्वेषापोटी-अॅड.रोहीणी खडसे
चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप हे राजकीय द्वेषापोटी केले असल्याची प्रतिक्रिया बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहीणी खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. बँकेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी लोकांनी आम्हाला इथे निवडून पाठविले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर द्यावे, असे वाटत नाही. तसेच त्यांना खरच सहकारी कारखानदारी जिवंत रहावी, असे वाटत असेल तर ते सत्तेत आहेत. मधुकर सहकारी साखर कारखान्याला मागच्या हंगामापासूनच शासनाची थकहमी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ती मिळवून द्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
मसाकालाही २२ लाख मंजूर
सहकारी साखर कारखाने बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर केला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मधुकर सहकारी साखर कारखान्यास थकीत वीज बिलाचा भरणा करण्यासाठी २२ लाख रूपयांची मागणी मंजूर करण्यात आली.