महाविकास आघाडीच्या प्रयोगाला जळगाव जिल्हा परिषदेत ब्रेक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:07 PM2019-11-30T13:07:46+5:302019-11-30T13:08:30+5:30

राष्ट्रवादीच्या काही सदस्यांचे बंडाचे संकेत

Jalgaon Zilla Parishad breaks experiment to lead development | महाविकास आघाडीच्या प्रयोगाला जळगाव जिल्हा परिषदेत ब्रेक?

महाविकास आघाडीच्या प्रयोगाला जळगाव जिल्हा परिषदेत ब्रेक?

Next

जळगाव : जि.प.तील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रत्येकी एक अशा दोन सदस्य अपात्रेसंदर्भात आठ दिवसापूर्वीच जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त झाले आहे. जोपर्यंत 'स्टे आॅर्डर' आमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत या सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली आहे़ तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत स्वतंत्र भूमिका घेण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीचे गणित जुळण्याआधीच बिघडले आहे़
अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेत नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे़ भाजपकडूनच अध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवार येऊ शकतात, हे गृहीत धरूनच पुढील आखणी केली जात आहे़ शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्याकडून शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रयत्न होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे़ मात्र महाविकास आघाडीच्या गणितांचा पाया असलेल्या दोन सदस्य अपात्रतेच्या मुद्दयावर प्रशासकीय स्पष्टीकरण आल्यामुळे आता हा 'गणिताचा पेपर' महाविकास आघाडीसाठी जवळपास अशक्य झाला आहे़ भाजप नेते माजी आमदार एकनाथराव खडसे व शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांची भूमिका ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची मानली जात आहे़ या दोघांनी ठरविल्यास भाजपच्या एका गटाला दूर ठेवून सत्ता मिळविता येऊ शकते, असा दावा शिवसेनेकडून वारंवार होत आहे़ त्यामुळे या दोघा नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़
दरम्यान, दोन सदस्य अपात्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बहुमताचा आकडा घटणार असल्याने आम्ही स्वबळावरही सत्तेत राहू शकतो, मात्र, तरीही अडीच वर्ष साध दिलेल्या काँग्रेसला सोबत घेऊच, असेही भाजपतर्फे आता सांगितले जात आहे़
अध्यक्षपदासाठी भाजपमध्येच अंतर्गत लढत
गट -तट व महाविकास आघाडीच्या समीकरणांची पार्श्वभूमी बघता भाजपला व्हीप काढून सत्ता टिकविण्याची धडपड करावी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे़ मात्र, अध्यक्षपदावरून भाजपमधून दोन ते तीन उमेदवार अर्ज दाखल करू शकतात तर दोन उमेदवारांचे अर्जही कायम राहू शकतात व पेच निर्माण होऊ शकतो, अशी सध्या परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे़ अशा स्थितीत पक्ष काय भूमिका घेतो?यावर जि़ प़ ची पुढील राजकीय समिकरणे अवलंबून असतील.
आघाडी होण्याआधीच मोठा धक्का
गेल्या वेळी निवडणुकीत गैरहजर राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे़ या सदस्यांशी गेल्या आठ दिवसांपासून राष्ट्रवादीचे सदस्य सातत्याने संपर्कात असून आपल्याला बदल घडवायचा असल्याची उदाहरणे दिली जात आहे, मात्र, पक्षाने आम्हाला आतापर्यंत विचारले नाही, आता गरज भासल्यावर आम्हाला विचारले जाते, अशा शब्दात यापैकी एका सदस्याने नाराजी व्यक्त केली असून आता आमची भूमिका आम्ही ठरवू, असे सांगितल्याने महाविकास आघाडी निर्माण होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे़

Web Title: Jalgaon Zilla Parishad breaks experiment to lead development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव