जळगाव जिल्हा परिषद अधिकाऱ्याची चौकशी
By admin | Published: March 26, 2017 02:38 AM2017-03-26T02:38:49+5:302017-03-26T02:38:49+5:30
चोपडा येथील जिल्हा बँक शाखेत नोटा बदल प्रकरणात जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी
जळगाव : चोपडा येथील जिल्हा बँक शाखेत नोटा बदल प्रकरणात जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्यासह दोघा अधिकाऱ्यांची सीबीआयने शनिवारी चौकशी केली. तसेच या प्रकरणात एका बड्या व्यक्तीच्या चौकशीसाठी वॉरंटही सीबीआय पथकाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाणी यांची बांधकाम व इतर व्यवसायांमध्ये काही व्यक्तींसोबत भागीदारी असल्याचा व त्यांनी मोठा पैसा गुंतविल्याचा संशय केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) आहे. मोहनगरातील वाणी यांचे शेजारी ओम जांगीड व जि.प.तील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक भूषण तायडे यांची शनिवारी चौकशी करण्यात आली. जांगीड यांची सकाळी ९ ते सायंकाळी पाच तर वाणी यांची सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० पर्यंत चौकशी झाली. भूषण तायडे यांचीही दुपारी तीन तास चौकशी झाली.
नोटाबदली प्रकरणाशी सुभाष चौक अर्बन को.आॅप. क्रेडीट सोसायटीचा संबंध असल्याप्रकरणी या सोसायटीचे सल्लागार भरत शहा यांचीही चार तास चौकशी झाली. हे प्रकरण आणखी कुणापर्यंत पोहोचते, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वाणी व जांगीड यांना समोरासमोर काही प्रश्न विचारण्यात आले. चौकशीमधील कुठलाही तपशील समोर आलेला नाही. नंदकुमार वाणी यांचा मोबाईल सीबीआयच्या पथकाने जप्त केला आहे. तसेच चौकशीसंबंधी कुठलीही माहिती कुणाला सांगू नये, चौकशीसाठी सहकार्य करावे, अशा सूचना वाणी यांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)