जळगाव जिल्हा परिषद करणार वीज निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:46 PM2018-09-05T12:46:18+5:302018-09-05T12:55:46+5:30
जि.प. प्रशासनाचा निर्णय
जळगाव : जिल्हा परिषदेला दरमहा वीज बिलावर लाखोंचा खर्च करावा लागतो त्यातच सोलरची वीज उपलब्ध होणे तूर्तास बंद झाले आहे. त्यामुळे नवीन इमारतींवर वीज निर्मिती संच उभारून आॅनग्रीड प्रणालीला जोडून ही वीज स्वत: वापर व महावितरणला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुमारे १० लाखाचा खर्च यावर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सद्यस्थितीत जिल्हा परिषदेत महावितरणच्या विजेचा वापर केला जातो. जिल्हा परिषदेची सोलर यंत्रणा आहे मात्र ती बंद अवस्थेत आहे. या यंत्रणेच्या बॅटरी निकामी झाल्याने ही यंत्रणा देखील कोलमडली असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यावर जनित्राचा आधार घ्यावा लागत आहे.
त्यातच जुन्या इमारतीत वीज पुरवठा खंडीत झाला तर पर्यायच नसल्याने कामे खोळंबतात. सद्य स्थितीत फक्त नव्या इमारतीत जनित्राचा पर्याय असला तरी जुन्या इमारतीला पर्यायी व्यवस्था नाही. सोलर प्रणाली कार्यान्वीत करून वीज निर्मिती करणे व आॅनग्रीड पद्धतीने ती महावितरणला देणे प्रस्तावित आहे.
दोन्ही इमारतींसाठी जनरेटर
निर्मिती झालेली वीज जि.प.च्या कामासाठी वापरली जाईल तर अधिक वीज निर्मिती झाल्यास ती महावितरणला दिली जाईल व कमी निर्मीती झाल्यास आवश्यक वीज महावितरणकडून घेतली जाईल त्यामुळे खर्चात बचत होणार आहे. लवकरच ही प्रणाली सुरू होणार आहे. त्यासाठी सोलरच्या बॅटरी व पॅनलची विक्री केली जाणार आहे. उर्वरीत निधी जि.प. फंडातून वापरून १० लाखात ही यंत्रणा कार्यान्वीत केली जाणार आहे. या विजेमुळे दोन्ही इमारतीच्या विजेचा प्रश्न सुटणार आहे. जनरेटर सिस्टीम देखील अद्यावत करण्यात येणार असून त्यासाठी देखील ५ लाखाची तरतूद करण्यात येत असल्याची माहिती जि.प. सूत्रांनी दिली.