जळगाव जिल्हा परिषदेत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:51 AM2018-11-28T11:51:21+5:302018-11-28T11:52:11+5:30
अनियमितता आढळली
जळगाव : धरणगाव तालुक्यातील पथराड खु.।। येथील ग्रामपंचायतमधील अनागोंदी व गैरव्यवहाराबाबत वारंवार तक्रारी करून दखल घेतली जात नसल्याने संतप्त मिथुन पितांबर साळुंखे या तरुणाने मंगळवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
साळुंखे यांनी ग्रा.पं.मधील गैरव्यहार, दप्तरात खाडाखोड, शासकीय नियम धाब्यावर बसवून सरपंच, ग्रामसेवक यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या २०१६-१७ ते आजपर्यंतच्या कामातील तफावत, अनियमितता याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावरून चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीही झाली, त्यात अनियमितता आढळली. याप्रकरणी फौजदारी गुन्हाची शिफारस असताना जिल्हा परिषदेकडून कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त मिथुन साळुंखे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
विविध तक्रारींच्या चौकशीसाठी समिती नेमून आठ दिवसात कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.