जळगाव जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीकडून प्रयत्न, शिवसेनेच्या अनेक सदस्यांना भाजपचा दूरध्वनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:15 PM2020-01-01T12:15:25+5:302020-01-01T12:16:12+5:30
...तर मग महाविकास आघाडीची सत्ता
जळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीकडून पर्यायाने राष्ट्रवादीकडून होणारे सर्वोतोपरी प्रयत्न लक्षात घेता, भाजपकडून थेट शिवसेना सदस्यांशी संपर्क साधून विचारपूस सुरू झाली आहे़ शिवसेनेच्या अनेक सदस्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मंगळवारी फोन आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़
दरम्यान, राष्ट्रवादीच्या संपर्क असलेल्या भाजपच्या त्या तीन सदस्यांबाबतचा सस्पेंस संपला असून ते तिघेही सोमवारी रात्री भाजपच्या गोटात सहभागी झाल्याचेही वृत्त आहे़ जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सोडून अन्य तीन पक्षांचे सदस्य सहलीला रवाना झालेले आहेत़ राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने जिल्हा परिषदेत तिनही पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून त्यांच्याकडून होणारे दावे बघता भाजपने धोकाओळखून म्हणून सदस्यांना अज्ञातस्थळी हलविले आहे़
भाजपच्या तीन सदस्यांबाबात साशंकता निर्माण झालेली होती़ हे सदस्य आपल्याकडे असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता़ तर हे सदस्य आमच्यासोबतच आहेत. असा प्रतिदावा भाजपने केला होता, मात्र, या सदस्यांबाबतचा निर्माण झालेल्या संभ्रमामुळे जिल्हा परिषदेत बदलाचे वारे अधिकच वेगाने वाहू लागले होते़ मात्र, हे तीनही सदस्य सोमवारी रात्री भाजपच्या अन्य सदस्यांसोबत सहभागीझाले़ भाजपच्या सदस्यांची संख्या ३३ झाली असून अन्य पक्षांचे काही सदस्य आमच्यासोबतच आहेत, काँग्रेसही आम्हालाच मतदान करेल, असा विश्वास भाजपच्या सदस्यांना असून महाविकास आघाडीची आशा मावळल्याचा दावा भाजपकडून होत आहे़ दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत अजिंठा विश्रामगृहात जि़ प़ सदस्यांची दुपारी चार ते पाच यावेळेत बैठक होण्याची शक्यता आहे़
रात्री उशिरापर्यंत संपर्क
काँग्रेसचे सदस्यांनी रात्री उशिरा शिवसेनेच्या सदस्यांशी संपर्क केला, शिवाय राष्ट्रवादीकडूनही संपर्क सुरू असून मंगळवारी मात्र, अचानक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या सदस्यांना फोन करून चाचपणी केली़ राष्ट्रवादी- काँग्रेस- शिवसेना हे सदस्य एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली.
राष्ट्रवादीचे एक व शिवसेनेचे एक असे दोन सदस्य अपात्र झाल्यामुळे महाविकास आघाडीचे गणित फिस्कटले़ मात्र, जिल्हाधिकाºयांचा हा निर्णय असल्याने याला स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ शिवाय यासंदर्भात ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही पक्षाकडून याबाबत पाठपुरावा सुरू असून येत्या एक दोन दिवसात अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती मिळविण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत़ या दोन सदस्यांचे चित्र स्पष्ट झाल्यास सर्व सदस्य परतून भाजपच्या काही सदस्यांना गैरहजर ठेवून महाविकास आघाडी विनाअडथळा सत्ता स्थापन करेल.
शिवसेनचे एकही सदस्य फूटलेले नाही व फुटणारही नाही, सर्व सदस्यांवर आमचा विश्वास आहे़ शिवसेनेच सर्व सदस्य जिल्ह्यातच थांबून आहे़ बुधवारी पक्षाचे नेते बैठक घेणार आहे व त्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतील़
- नानाभाऊ महाजन, सदस्य शिवसेना