जळगाव जि.प. समोर अतिक्रमणाविरोधात ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:50 PM2018-10-04T12:50:15+5:302018-10-04T12:51:03+5:30
पुराव्यासह अहवालाची मागणी
जळगाव : पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील सरपंचांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही गटविकास अधिकाºयांकडून चौकशीचा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करीत सरपंचाला अभय दिले जात आहे, असा आरोप करीत त्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी बुधवारपासून जि.प.समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
यासंदर्भात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांना ग्रा.पं. सदस्य आनंदा पाटील, सुपडू पाटील आणि कलाबाई पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन देत जि.प. समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.
निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील सरपंच मधुकर पाटील यांनी अतिक्रमण केले असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईची मागणी सदस्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करण्यात आला असता, जिल्हाधिकाºयांनी चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर सदस्यांनी उपोषण सुरु करुन अतिक्रमणाबाबत पुराव्यांसह अहवाल मागितला होता. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिका-यांनी अर्धवट अहवाल आणून सदस्यांचे उपोषण सोडले होते. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पुन्हा गट विकास अधिका-यांना पत्र देऊन पुराव्यांसह अहवाल मागितला होता. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही पुराव्यासह अहवाल दिला नाही. याबाबत विचारणा केली असता, ग्रामपंचायतीकडून अहवाल आला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाचोरा गटविकास अधिकारी अहवाल देण्यास दिरंगाई करून सरपंचांना पाठीशी घालत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या सदस्यांनी केला आहे. जोपर्यंत पुराव्यासह अहवाल मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. याप्रसंगी दशरथ पाटील, पी.के. पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नवल गुजर, ईश्वर धनगर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.