जळगाव जि.प. अध्यक्ष निवड : सेनेने विश्वास जिंकला, काँग्रेस, राष्ट्रवादीने गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:03 PM2020-01-04T12:03:40+5:302020-01-04T12:04:01+5:30

नाराजांची संख्या कमी करण्यावर भाजपचा भर, काँग्रेस राष्ट्रवादीची फुटीची परंपरा कायम

Jalgaon Zip President-elect: Sena wins trust, Congress, Nationalist lose | जळगाव जि.प. अध्यक्ष निवड : सेनेने विश्वास जिंकला, काँग्रेस, राष्ट्रवादीने गमावला

जळगाव जि.प. अध्यक्ष निवड : सेनेने विश्वास जिंकला, काँग्रेस, राष्ट्रवादीने गमावला

Next

आनंद सुरवाडे 
जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाविकास आघाडीची सत्ता येता - येता राहिली़ या निवडणुकीत भाजपने पदे जिंकली, शिवसेना सदस्यांनी कुठल्याही सहलीवर न जाता पक्षाच्या भूमिकेवर ठाम राहत विश्वास जिंकला, मात्र, पराभव झाला तो खऱ्या अर्थाने काँग्रेस व राष्ट्रवादीचा. कारण गेल्या वेळेची फुटीची परंपरा या दोनही पक्षांच्या सदस्यांनी कायम राखत भूमिकेवर ठाम राहण्यासंदर्भातील विश्वास गमावला़ स्थानिक राजकारणासाठी आता हा शिक्का या दोनही पक्षांना आगामी काळात जड जाईल, असे एकंदरीत चित्र आहे़
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडत काँग्रेसच्या सदस्यांनी थेट भाजपच्या हातात हात मिळवून 'सबका साथ सबका विकास' ही भाजपचीच टॅग लाईन जळगाव जिल्हा परिषदेत यशस्वी करून दाखविली़ या युतीला सेनेने अभद्र युती असे नाव दिले़ मात्र, स्थानिक राजकारण वेगळे असते, असे सांगत भाजप व काँगे्रसने या टिकेकडे दुर्लक्ष केले़ चार सदस्यांच्या काँग्रेसला एक सभापती पदही मिळाले़ जिथे पंधरा व सोळा सदस्य असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेला विरोधात बसावे लागले़ राज्यात सत्ता समिकरणे बदलल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हे नव्याने उद्यास आलेले तिहेरी समिकरण यशस्वी करण्याचे आदेश आले व गणिते जुळविण्यासाठी तिघेही पक्ष जोराने कामाला लागले़ जळगाव जिल्हा परिषदेत दोन सदस्य अपात्रतेचा मुद्दा अगदीच कळीचा मुद्दा बनला होता कारण या दोन सदस्यांवरच सत्तेची सर्व समिकरणे फिरणार होती़ हे सदस्य अपात्र झाल्यामुळे महाविकास आघाडी अल्पमतात आली होती व भाजपचे स्पष्ट बहुमत होत होते़ अशा स्थितीतही समान निधीचा मुद, कामे रखडल्याचा मुद्दा समोर करून भाजपचे अनेक सदस्य नाराज असल्याचे सांगत महाविकास आघाडीकडून पहिले पाऊल टाकले ते राष्ट्रवादीने . राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अचानक या प्रक्रियेत एंट्री घेतली पक्षाने तात्काळ व्हिपही बजावला़ तिकडे काँग्रेसच्या निरीक्षकांनी बैठक घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला व हालचाली गतिमान झाल्या़
वातावरणनिर्मितीत मात्र आघाडी
बहुमत नसतानाही महाविकास आघाडीने अगदी शेवटपर्यंत किल्ला लढविला व भाजपला सहजासहजी विजय मिळू दिला नाही़ आघाडीच्या दाव्यांनी भाजपचा त्यांच्या सदस्यांवरील विश्वासच उडाला व पक्षाने त्यांना सहलीला तर पाठवलेच त्यांचे मोबाईलही जप्त केले़ ही सर्व काळजी घेऊनही एक सदस्या मात्र, गैरहजर राहिल्या़ माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार गिरीश महाजन यांचा या प्रक्रियेतील शेवटच्या दिवशीच्या एकत्रीत सहभाग यामुळे अनेक गणितेही फिरली़ खडसेंचा गट नाराज होऊन महाविकास अघाडीला मिळू शकतो या सर्व शक्यता बघून दोनही नेते अखेर एकत्र आल्याचे बोलले जात आहे़ राज्यातील मंत्रीमंडळ मंडळ विस्ताराला होणारा विलंब भाजपच्या पथ्थ्यावर पडला़
खडसेंचे वर्चस्व, उपाध्यक्षांचे दालन केंद्र
अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच़ इच्छुकांच्या व रावेरच्या पदाधिकाऱ्यांच्या उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन दालनात बैठका वाढल्या़ होत्या़ अखेर व्हाया उपाध्यक्ष महाजन एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून रंजना पाटील यांचे नाव अंतिम ठरले़, असेही समोर येत आहे़ इकडे समान निधीवरून नाराजांचा आवाज ठरलेले सदस्य लालचंद पाटील यांना संधी मिळणे हे तेवढे अनपेक्षित नव्हते, जातीय समिकरणांचा विचार केल्यास त्यांच्याकडे पद जाण्याची शक्यता होतीच़ तेही खडसेंचे निकटवर्तीय़ नाराजांची संख्या वाढणार नाही हे लक्षात घेऊनच भाजपकडून पदे देण्यात आली़ यात एकनाथराव खडसे यांची भूमिका महत्त्वाची ठरली त्यांनी आधीच कुणालाही पुन्हा संधी मिळणार नाही हे स्पष्ट करून अन्य इच्छुकांची नाराजी तेथेच कमी केली होती़

Web Title: Jalgaon Zip President-elect: Sena wins trust, Congress, Nationalist lose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव