जळगाव जि.प. सर्वसाधारण सभेत अध्यक्षा म्हणाल्या, त्यांना बोंबलू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:06 PM2018-11-29T13:06:18+5:302018-11-29T13:07:49+5:30
निधी वाटपाच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये फूट
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत समान निधी वाटपाच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी सुरू असताना जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्याशी बोलताना आपण मागील सभेत ठराव केला आहे. पुढचा विषय घ्या, त्यांना बोंबलू द्या, असे वक्तव्य केले. यावरून अधिकच गोंधळ उडाला. त्यामुळे अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांनी सभेत माफी मागावी, अशी जोरदार मागणी या सदस्यांनी करत अध्यक्षांची कोंडी केली. शेवटी या प्रकरणी भाजप गटनेते पोपट भोळे, उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी आक्रमक झालेल्या सदस्यांची समजूत काढल्याने वाद निवळला.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत समान निधी वाटपाच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. निधी वाटप करताना झुकते माप दिल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या ३३ पैकी १९ सदस्यांनी स्वकियांविरोधात शड्डू ठोकले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी देखील या मुद्यावरून तळी उचलून धरत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. दोनतास चाललेल्या गोंधळानंतर ४९ पेक्षा अधिक सदस्यांनी विरोध केल्याने हा विषय नामंजूर करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपावर आली. त्यामुळे आपल्या गटासाठी जास्तीचा निधी पळविण्याचा सत्ताधारी भाजपच्या एका गटाचा डाव उधळला गेला.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात बुधवारी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे, शिक्षण समिती सभापती पोपट भोळे, समाजकल्याण समिती सभापती प्रभाकर सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण, आरोग्य समिती सभापती दिलीप पाटील उपस्थित होते.
घोषणाबाजीने दणाणले सभागृह
समान निधी मिळालाच पाहीजे, विकासासाठी एकजुटीचा विजय असो, जयपालभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा सभागृहात विरोधी गटातील शिवसेना, राष्टÑवादी कॉँग्रेस, कॉँग्रेसचे सदस्य देत होते. तर काही सदस्य जोरजोराने बाक वाजवून सत्ताधाºयांच्या भूमिकेचा निषेध करत होते. हळू हळू सर्व आक्रमक सदस्य स्टेजवर चढून गेले.
१२० कोटींच्या निधीवरुन वाद
विकासकामे करण्यासाठी जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन व विकास समितीकडून १२० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीच्या वाटपासंदर्भात मागील सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या एका गटाने ठराव केला होता. या सभेचे इतिवृत्त आताच्या सभेत कायम करताना निधी वाटपाचा मुद्दा चर्चेला आला.
अन् ठिणगी पडली
हा विषय सुरू होताच भाजपच्या दुसºया गटातील सदस्यांसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. जिल्हा नियोजन व विकास समितीकडून मंजूर झालेल्या निधीचे समान वाटप झालेच पाहिजे. गेल्या सभेत आम्ही ठरावाला विरोध केला होता. तसे पत्रदेखील प्रशासनाला दिले होते. तरी हा मुद्दा या सभेत चर्चेला आला कसा? असा प्रश्न उपस्थित करत ठरावाला विरोध करत सदस्यांनी सभागृहात जोरदार गोंधळ सुरू केला.
पदाधिकाºयांकडून दबावतंत्र
मागील सभेत निधी वाटपाचा ठराव सवार्नुमते पारित झाला होता. त्यामुळे आता विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत सत्ताधारी भाजपच्या गटातील अध्यक्ष व उपाध्यक्षांची भूमिका होती. याला शिवसेनेचे नानाभाऊ महाजन, प्रताप पाटील, शशिकांत साळुंखे, भाजपाचे जयपाल बोदडे, पल्लवी सावकारे, रवींद्र सुर्यभान पाटील यांनी आक्षेप घेतला. शेवटी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ४९ सदस्यांनी हा विषय नामंजूर करण्याचे पत्र अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना दिले.
...अधिकारांचा गैरवापर करू नका
सभेत आपला मुद्दा मांडताना भाजपचे सदस्य रवींद्र पाटील गटनेते पोपट भोळे यांना उद्देशून म्हणाले की, तुम्हाला अधिकार दिले म्हणून त्यांचा गैरवापर करू नका. सर्व सदस्यांना समान निधी वाटप झालाच पाहिजे. त्यात कोणत्याही पक्षाचा विषय नाही, असे त्यांनी सांगितले. विरोध होत असतानाही पदाधिकारी यांचे दबावतंत्र सुरू होते. त्यामुळे संतापलेल्या सदस्यांनी, हा तर लोकशाहीचा खून असल्याचे सांगत त्यांनी सभात्याग करण्याचा इशारा दिला. .
जि.प.त भाजपा ‘अल्पमतात’
समान निधीच्या विषयावरून जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गट अल्पमतात आल्याची स्थिती असून स्वकीयांचेही बंड सभागृहात दिसून आल्याने जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांची खूर्ची डळमळीत झाल्याचीच परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या ६७ आहे. यात भाजपाचे सर्वाधिक ३३, शिवसेना १४ राष्टÑवादी कॉँग्रेस १६ तर कॉँग्रेसचे ४ सदस्य आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून विकास कामांसाठी प्राप्त १२० कोटींच्या असमान निधी वाटपाच्या विषयावरून तब्बल ४९ सदस्य एका बाजुला आल्याचे चित्र सभागृहात होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडेंना अधिकार दिले कुणी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे यांनी इतिवृत्तातील डीपीडीसी निधीबाबतच्या ठरावास विरोध असलेल्यांनी हात वर करावा असे सांगताच विरोधकांसह सत्ताधारी ४९ सदस्यांनी हात वर केला.यावर भाजपाचे मधुकर काटे यांनी आक्षेप घेतला. मतदान घेण्याचा अकलाडे यांना अधिकार दिला कुणी असा प्रश्न करत आक्षेप घेतला. सर्व सदस्यांनी व्यासपीठावर जाऊन डीपीडीसी वाटपाच्या निधीस विरोध करणाºया ४९ सदस्याचे निवेदन दिले.